नाफेड सोयाबीन खरेदीचे थकीत पैसे तात्काळ जमा करण्याबाबत आ. भीमराव केराम यांची मागणी

 

Gavakadachibatmi



किनवट येथील नाफेड सोयाबीन खरेदीचे थकीत पैसे तात्काळ जमा करण्याबाबत आ. भीमराव केराम यांची मागणी


गावाकडची बातमी


 किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार भीमराव रामजी केराम यांनी पुढाकार घेत राज्य शासनाकडे तातडीची मागणी केली आहे. किनवट कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नाफेडद्वारे हमीभावाने खरेदी करण्यात आलेल्या सोयाबीनच्या रकमेबाबत शेतकऱ्यांना अद्यापही पैसे मिळाले नसल्याचा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

यासंदर्भात आ. केराम यांनी मा. जयकुमार रावल (मंत्री, पणन व MD MSAMB) यांना पत्र पाठवून तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

पत्रात नमूद केल्यानुसार, किनवट येथील नाफेड खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन विक्री केली असून, या व्यवहारास दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे आधीच अतिवृष्टी व नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर आर्थिक संकट अधिकच गडद झाले आहे.

शेतकऱ्यांच्या दैनंदिन गरजा, कुटुंबीयांचे विवाहकार्य, उधारीची परतफेड तसेच आगामी हंगामाचे नियोजन या सर्व गोष्टी या थकीत रकमेअभावी ठप्प झाल्या आहेत. परिणामी शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष निर्माण होत असल्याचेही आ. केराम यांनी नमूद केले आहे.

आ. केराम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश देऊन सुमारे ₹34,41,888/- (चौतीस लाख एकेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये) इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरीत जमा करण्यात यावी, अशी ठाम मागणी केली आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध राहून त्यांच्या अडचणी शासन दरबारी मांडण्याचे कार्य सातत्याने सुरू ठेवणार असल्याचा विश्वास आ. भीमराव केराम यांनी व्यक्त केला आहे.


Post a Comment

Previous Post Next Post