रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्स्फूर्त प्रतिसाद

 





किनवट: वझरा (बु.) वीर बापूराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त वझरा (बु.) येथे आयोजित करण्यात आले. रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडले. सामाजिक उपक्रमांसाठी नेहमीच चर्चेत असलेल्या जयंती उत्सव समिती, वझरा (बु.) यांच्या पुढाकारातून हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यंदा या उपक्रमाला जय जोहार आदिवासी आरोग्य संस्था, किनवट यांचे विशेष सहकार्य लाभले.


आरोग्य शिबीर आयोजित करण्याची कल्पना समोर आल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष डॉ. पुंडलिक गोमाजी आमले यांनी तत्काळ पुढाकार घेत आपल्या डॉक्टर मित्रांशी संपर्क साधला. त्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे हे आरोग्य शिबीर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिबिरासाठी आवश्यक असलेली औषधे, गोळ्या आणि इंजेक्शन यासाठी डॉक्टर पुंडलिक आमले यांच्या  जय जोहार आदिवासी आरोग्य संस्था, किनवट यांच्या माध्यमातून सुमारे ४० हजार रुपयांची औषधे उपलब्ध करून देण्यात आली. तसेच जयंती उत्सव समिती, वझरा (बु.) यांच्या वतीनेही काही औषधांची व्यवस्था करण्यात आली.


या आरोग्य शिबिरामध्ये परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. सुमारे ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला, तर मोफत आरोग्य शिबिरामध्ये सुमारे २५१ रुग्णांनी आरोग्य तपासणी करून घेतली. शिबिरात नागरिकांची शुगर, बीपी तसेच ECG तपासणी करण्यात आली. गरज असलेल्या रुग्णांना तात्काळ औषधे, इंजेक्शन तसेच आवश्यक ते उपचार देण्यात आले.


या शिबिरासाठी अनेक तज्ञ डॉक्टरांनी निस्वार्थ भावनेने आपला अमूल्य वेळ देत नागरिकांची सखोल तपासणी केली. यामध्ये डॉ. जयराम बस्सी (MBBS, DNB Medicine), डॉ. प्रशिक सिरसट (MBBS Ortho), डॉ. पुंडलिक आमले (MBBS, C. Rheumatologist) आणि डॉ. गौतम नरवाडे (MBBS, जनरल फिजिशियन) यांनी उपस्थित राहून रुग्णांना मार्गदर्शन केले व आवश्यक उपचार दिले. त्यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे हे आरोग्य शिबीर यशस्वीरीत्या पार पडले. या सहकार्याबद्दल जयंती उत्सव समितीने सर्व डॉक्टरांचे आभार मानले.



आरोग्य शिबीर आयोजित करण्याचा हा जयंती उत्सव समितीचा पहिलाच अनुभव असला तरी समाजाला प्रत्यक्ष उपयोगी पडेल असा उपक्रम राबवण्याचा समितीचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले. गावकऱ्यांनीही या उपक्रमाचे स्वागत करत डॉक्टरांनी दिलेल्या अमूल्य वेळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

या सामाजिक उपक्रमामुळे वझरा (बु.) परिसरातील अनेक नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी व उपचाराचा लाभ मिळाला असून वीर बापूराव शेडमाके जयंती सामाजिक कार्यातून साजरी करण्याचा आदर्श उपक्रम म्हणून या कार्यक्रमाची परिसरात चर्चा होत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post