नारायण नगरी येथे या भव्य सोहळ्याचे आयोजन

 





सारखणी  येथे भव्य शोभायात्रा व महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९:३० वाजता कार्यक्रमास प्रारंभ होणार असून किनवट रोडवरील नारायण नगरी येथे या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हिंदू समाजात जागृती निर्माण करणे, सांस्कृतिक मूल्यांचे जतन व संवर्धन करणे तसेच सामाजिक एकात्मता दृढ करणे, या उद्देशाने या विराट संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. बदलत्या काळात समाजात सकारात्मक विचारांचा प्रसार व्हावा, धर्म व परंपरांविषयी अभिमान जागृत व्हावा आणि युवकांमध्ये संघटनशक्ती वाढावी, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.


या संमेलनानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून, पारंपरिक वेशभूषा, धार्मिक ध्वज, वाद्यांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात ही मिरवणूक निघणार आहे. गावातील तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी होण्याची शक्यता असून, कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


कार्यक्रमास विविध मान्यवर संत-महंतांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यात महंत जितेंद्र महाराज, श्री. सुरेश महाराज, श्री. गंगेश्वर महाराज तसेच ह.भ.प. बाळू महाराज काकाणी यांचा समावेश आहे. याशिवाय अखिल भारतीय धर्म जागरण प्रमुख श्री. शरदराव ढोले हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहून समाजप्रबोधन वर मार्गदर्शन करणार आहेत.


या कार्यक्रमात समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न असून, परस्पर सहकार्य व बंधुभाव वृद्धिंगत करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.


या भव्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी सकल हिंदू समाज, सारखणी यांच्या वतीने नियोजनबद्ध तयारी करण्यात येत आहे. आयोजकांनी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post