फर्दापूर येथे भंगार दुकानाला शॉर्टसर्किटमुळे लागली आग

 

आग



शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने १५ लखाचा नुकसान


सोयगाव तालुका प्रतिनिधी सादिक शेख


सोयगाव: छत्रपती संभाजीनगर : जळगाव महामार्गावरील रिजवान बॅग अखतर बॅग यांचे दुकान असलेल्या एका भंगार दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची गंभीर घटना घडली. या भीषण आगीत सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

माहितीनुसार, संबंधित भंगार दुकानात कॉपर पाण्याचे ड्रम, जुने फर्निचर तसेच विविध प्रकारचे ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आले होते. अचानक लागलेल्या आगीने काही क्षणातच उग्र रूप धारण केले आणि संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. धुराचे मोठे लोट परिसरात पसरल्यामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेतली. गावातील नागरिकांनी स्वतःच्या पुढाकाराने पाणी टँकर घटनास्थळी आणून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या या तत्परतेमुळे आगीचा फैलाव रोखण्यात मोठी मदत झाली आणि शेजारील दुकाने व घरांना संभाव्य धोका टळला.

 तसेच नागरिकांच्या मदतीने आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत दुकानातील बहुतेक साहित्य जळून खाक झाले होते.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अचानक आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या घटनेनंतर प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली असून तपास सुरू आहे. नागरिकांच्या सतर्कता आणि एकजुटीमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना परिसरात व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post