अधिकृत पादचारी पुलाकडे दुर्लक्ष ; नियमभंगाबद्दल दंडात्मक कारवाई
विदर्भ संपादक मिलिंद जामनिक
मूर्तिजापूर - येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील तीन कर्मचारी रेल्वे नियमांचे उल्लंघन करताना रेल्वे संरक्षण दलाने (RPF) पकडल्याची घटना गुरुवारी मूर्तिजापूर रेल्वे स्थानक परिसरात घडली. अधिकृत पादचारी पुलाचा वापर न करता थेट रेल्वे लाईन ओलांडण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यावरून दररोज अप-डाऊन करणारे हे कर्मचारी सकाळी सुमारे अकराच्या सुमारास महाराष्ट्र एक्सप्रेसने मूर्तिजापूर येथे उतरले. त्यानंतर घाईगडबडीत त्यांनी स्थानकावरील अधिकृत पादचारी पुलाचा वापर न करता थेट रेल्वे लाईन ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी गस्त घालत असलेल्या RPF जवानांनी त्यांना रंगेहात पकडले. रेल्वे नियमांचे उल्लंघन केल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात आली.
दरम्यान, हे कर्मचारी अकोल्यावरून मूर्तिजापूर येथे दररोज ये-जा करत असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपासून ते कामावर वारंवार उशिरा येत असल्याच्या तक्रारीही वाढल्या होत्या. आज झालेल्या कारवाईनंतर उशिरा येण्यामागील कारणही समोर आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी रेल्वे लाईन ओलांडताना अधिकृत पादचारी पूल किंवा सबवेचाच वापर करावा, असे आवाहन केले आहे. नियम मोडून रेल्वे लाईन ओलांडणे हा गंभीर गुन्हा असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
--------------------------------------------------------
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी शिस्त व नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. रेल्वे सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणे धोकादायक असून अशा प्रकारांना आम्ही समर्थन देत नाही. संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात येतील व भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक ती शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.
डॉ. राजेंद्र नेमाडे,वैद्यकीय अधीक्षक
श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापूर
