जामठी बु येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र समाधान शिबीर उत्साहात

 




तालुक्यातील पहिल्या शिबिरात 1153 प्रमाणपत्रांचे वाटप ; विविध विभागांचे 15 स्टॉल





 मूर्तिजापूर : महाराष्ट्र शासनाच्या 17 फेब्रुवारी 2026 च्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र समाधान शिबीर’ अभियानाच्या टप्पा 1 अंतर्गत तालुक्यातील पहिले शिबीर राजस्व मंडळ जामठी बु. येथील जिल्हा परिषद शाळा येथे उत्साहात पार पडले.

          जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी संदिपकुमार अपार व तहसीलदार  शिल्पा बोबडे यांनी 7 मार्च 2026 रोजी या शिबिराचे आयोजन केले. या शिबिराला विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथील उपायुक्त तुकाराम टेकाडे यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच तालुक्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

         शिबिरात नागरिकांच्या सोयीसाठी महसूल विभाग, पुरवठा विभाग, संजय गांधी योजना, महिला व बाल विकास, महावितरण, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, आरोग्य विभाग, सेतू केंद्र, आधार सेवा, महिला बचत गट, दुय्यम निबंधक, भूमी अभिलेख तसेच तक्रार निवारण कक्ष अशा विविध विभागांचे एकूण 15 स्टॉल उभारण्यात आले होते. या माध्यमातून नागरिकांना डिजिटल सेवा, ई-फेरफार, ई-मोजणी, अभिलेख दुरुस्ती, विविध प्रमाणपत्रांचे वितरण तसेच महसुली मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले.



      कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपविभागीय अधिकारी संदिपकुमार अपार यांनी भूषविले, तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक तहसीलदार  शिल्पा बोबडे यांनी केली. यावेळी गटविकास अधिकारी मिलिंद मोरे, तालुका कृषी अधिकारी दीपक तायडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जामठी बु. येथील सरपंच अर्चना संदीप तायडे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

   शिबिरादरम्यान मान्यवरांच्या हस्ते कूळ जमिनीबाबत (वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये) 4 प्रकरणे निकाली काढण्यात आली. अभियानांतर्गत 69 फेरफार प्रकरणे, 7/12 दुरुस्तीसाठी 31 अर्ज स्वीकृत, 367 डिजिटल 7/12 उतारे, 367 ‘8 अ’ उतारे तसेच 288 विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. एक खिडकी व्यवस्थेद्वारे 31 अर्ज निकाली काढण्यात आले असून एकूण 1153 प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी उपविभागीय अधिकारी संदिपकुमार अपार यांनी गाव नमुना 7/12 बाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानंतर मान्यवरांनी सर्व स्टॉलना भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. उपस्थित नागरिकांनी विविध स्टॉलना भेट देत योजनांची माहिती घेतली. अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यांचे तत्काळ निराकरणही केले.कार्यक्रमाच्या शेवटी मंडळ अधिकारी प्रशांत उचितकर यांनी मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी ऋषिकेश देशमुख, मनोज हिवराळे, संकेत गणवीर व अन्वेष खडसे यांनी विशेष सहकार्य केले.

तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी तालुक्यात विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र समाधान शिबिरांचा शेतकरी, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post