यवतमाळ : पवित्र रमजान महिना हा भक्ती आणि संयमाचा काळ मानला जातो. या काळात अबालवृद्ध मोठ्या उत्साहाने उपवास (रोजे) करतात. यवतमाळमधील कोहिनूर सोसायटी, पांढरकवडा रोड येथील रहिवासी जिमल फातेमा अतीक जावेद शेख या अवघ्या ५ वर्षांच्या चिमुकलीने या रमजान महिन्यातील २६ व्या दिवशी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा अत्यंत यशस्वीपणे पूर्ण केला आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात जिमलने दाखवलेली ही श्रद्धा आणि धार्मिक परंपरेबद्दलची निष्ठा सध्या परिसरात कौतुकाचा विषय ठरली आहे.
जिमल फातेमा हिने आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली हा पहिला रोजा ठेवला. पहाटेच्या सहरीपासून ते सायंकाळी सूर्यास्ताच्या इफ्तारपर्यंत तिने अन्नाचा कणही न घेता आणि पाण्याचा थेंबही न पिता हा कडक उपवास पूर्ण केला. तिच्या या जिद्दीची आणि धार्मिक निष्ठेची चर्चा संपूर्ण परिसरात रंगली असून, इतक्या लहान वयात तिने दाखवलेला हा संयम आणि चिकाटी पाहून तिचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि कोहिनूर सोसायटीतील नागरिकांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. जिमलने आपल्या आयुष्यातील पहिल्याच रोजातून समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले असून सर्व स्तरातून तिचे विशेष कौतुक होत आहे.

