अवैध दारू विक्रीकडे दुर्लक्ष करण्यासाठी मागितली लाच
; अकोला एसीबीची कारवाई, विभागात खळबळ
विदर्भ संपादक मिलिंद जामनिक
मूर्तिजापूर : ग्रामीण पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या लाचखोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले आहे. अवैध दारू विक्रीकडे दुर्लक्ष करण्यासाठी तक्रारदाराकडून लाच मागितल्याचा आरोप या दोन्ही कर्मचाऱ्यांवर आहे. या घटनेमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनभोरा गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीकडे दुर्लक्ष करण्यासाठी संबंधित बीट जमादार दिकानडे आणि रायटर ज्ञानेश्वर रडके यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला तीन हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी तक्रारदाराने अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता दोन्ही कर्मचाऱ्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान चर्चेनंतर हा व्यवहार तीन हजारांवरून दोन हजार रुपयांवर ठरल्याची बाबही तपासात पुढे आली.
एसीबीचे पथक आरोपींना रंगेहात पकडण्याच्या तयारीत असताना कारवाईची चाहूल लागल्याने संबंधित पोलिसांनी पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याचे समोर आले. मात्र, एसीबीने तत्काळ कारवाई करत पोलीस उपअधीक्षक मिलिंद बाहकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक इंगळे यांच्या पथकाने दोन्ही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले.
या कारवाईमुळे पोलीस खात्याच्या प्रतिमेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.
