धामणगावच्या कराटेपटूंनी गाजवली राज्यस्तरीय स्पर्धा

 


११ विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; तब्बल २२ पदकांची कमाई 


विभागीय संपादक| निलेश रामगावकर 

धामणगाव रेल्वे:  येथील बोधी बुडोकान कराटे असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी अकोला येथे आयोजित सातव्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धा २०२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल २२ पदकांची कमाई केली. या स्पर्धेत असोसिएशनच्या ११ विद्यार्थ्यांनी काता आणि कुमिते या दोन्ही प्रकारांत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत धामणगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.


अकोला येथे पार पडलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील कराटेपटूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत धामणगाव तालुक्यातील बोधी बुडोकान कराटे असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत प्रतिस्पर्ध्यांना जोरदार टक्कर दिली. त्यांच्या मेहनतीचे आणि सातत्यपूर्ण सरावाचे फलित म्हणून संघाने एकूण २२ पदकांवर आपले नाव कोरले.


या विद्यार्थ्यांनी मिळवले यश


या यशस्वी कराटेपटूंमध्ये श्रेयश लसने, नितेश्री हुमणे, संस्कृती टेकाम, श्रीयांश निघोट, नंदनी भेंडे, पृथ्वीका ढबाळे, पौर्णिमा नेवारे, रोहन खोब्रागडे, सान्वी दे, हर्षित ढबाळे आणि रुद्रानी मेटे यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे धामणगावच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे आयोजन


या स्पर्धेचे आयोजन दि महाराष्ट्र अॅमॅच्युअर कराटे असोसिएशनच्या सचिव सेन्सई डॉ. खुशबू चोपडे आणि अध्यक्ष सिहान अरुण सारवान यांच्या वतीने करण्यात आले होते. स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ब्लॅक बेल्ट सोनाली गुप्ता आणि सम्यक दहाट यांना विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.


मास्टर सचिन मून यांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा


बोधी बुडोकान कराटे असोसिएशनच्या विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट थर्ड डॅन, चॅम्पियन व मुख्य प्रशिक्षक मास्टर सचिन मून यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या नियोजनबद्ध प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांनी कराटेच्या विविध प्रकारांत प्रावीण्य मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीमुळे प्रशिक्षक मास्टर सचिन मून यांचेही सर्वत्र कौतुक होत आहे.


आजच्या काळात आत्मरक्षणाचे महत्त्व वाढले असून, विशेषतः मुला-मुलींसाठी कराटे प्रशिक्षण उपयुक्त ठरत आहे. कराटेमुळे शारीरिक तंदुरुस्ती, एकाग्रता, शिस्त आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. तसेच संकटाच्या प्रसंगी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित होतात. त्यामुळे या यशामुळे पालकांमध्येही कराटे प्रशिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.


यशाचे श्रेय मार्गदर्शक आणि पालकांना


या दैदिप्यमान यशाचे श्रेय भंते धम्मसार, तेलंगणातील आदिलाबाद येथील मुकेश कुमार कांबळे, आकाश पवार तसेच सर्व पालकांना देत प्रशिक्षक मास्टर सचिन मून यांनी त्यांचे आभार मानले.

धामणगावच्या ११ कराटेपटूंनी मिळवलेल्या २२ पदकांमुळे शहराच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, प्रशिक्षकांचे आणि पालकांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, भविष्यातही हे खेळाडू मोठ्या स्पर्धांमध्ये यश संपादन करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post