गणेशोत्सव व दुर्गादेवी उत्सव निर्विघ्नपणे संपन्न ; सहकार्याबद्दल ग्रामीण पोलिसांकडून नागरिकांचे आभार
Editor milind jamnik
मूर्तिजापूर : श्री गणेशोत्सव तसेच दुर्गादेवी व शारदादेवी उत्सव मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांततेत, आनंदात आणि उत्साहात पार पडले. ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डीजेचा वापर न करता पारंपरिक व शांततापूर्ण पद्धतीने उत्सव साजरे करण्याची भूमिका मंडळांनी घेतल्याने सामाजिक शांतता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यास मोठे सहकार्य मिळाले. उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य आणि जबाबदार नागरिकत्वाचा आदर्श निर्माण झाल्याबद्दल ग्रामीण पोलिसांनी सर्व संबंधितांचे आभार मानले आहेत.
उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी नियोजनबद्ध बंदोबस्त ठेवला. पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कर्तव्यनिष्ठेने केलेले नियोजन, परिश्रम आणि सतर्कतेमुळे उत्सव शांततेत पार पाडण्यास मदत झाली.या काळात आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, मूर्तिजापूर वकील महासंघ, ज्येष्ठ नागरिक, आपत्कालीन पथक, सफाई कामगार, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार बांधवांनी सहकार्य केले. तसेच उत्सव मंडळांचे पदाधिकारी, आयोजक, युवक मंडळे आणि सर्वसामान्य नागरिकांनी सामाजिक जबाबदारीचे भान राखत प्रशासनाला सहकार्य केल्याने उत्सव काळात शांतता कायम ठेवणे शक्य झाले.
सण-उत्सव हे केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि परस्पर सौहार्द वृद्धिंगत करण्याचे माध्यम आहेत. ध्वनिप्रदूषण टाळून आणि सामाजिक शांततेला प्राधान्य देऊन उत्सव साजरे करण्याची भूमिका समाजासाठी दिशादर्शक ठरते. यंदाच्या उत्सवात नागरिकांनी दाखविलेला संयम, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकी यामुळे शांततापूर्ण उत्सवाचा आदर्श निर्माण झाला.यापुढेही नागरिकांनी सर्व सण-उत्सव शांततेत व उत्साहात साजरे करावेत, ध्वनिप्रदूषण टाळावे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार सपोनि दीपक महाडिक यांनी केले. यावेळी त्यांनी उत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे मनःपूर्वक आभार मानले.
