किनवट बाजार समितीच्या सभापतीपदी आदिवासी संचालकाला संधी द्या!

 

नांदेड


किनवट बाजार समितीच्या सभापतीपदी आदिवासी संचालकाला संधी द्या


आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी आमदार भीमराव केराम यांनी पुढाकार घ्यावा; राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळू पाटील पवार यांची मागणी






किनवट: किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या घडामोडी घडत असून, दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या सभापतींविरुद्धच्या अविश्वास ठरावात १७ विरुद्ध १ अशा मतांनी ठराव पारित झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आता बाजार समितीच्या पुढील सभापतीपदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण किनवट तालुक्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी आदिवासी समाजातील संचालकाला संधी देऊन आदिवासी समाजाला न्याय द्यावा, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे किनवट तालुकाध्यक्ष बाळू पाटील पवार यांनी केली आहे.

किनवट हा आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्याच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जडणघडणीत आदिवासी समाजाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. मात्र, बाळू पाटील पवार यांच्या म्हणण्यानुसार, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थापनेपासून आजपर्यंत आदिवासी समाजातील व्यक्तीला सभापतीपदावर विराजमान होण्याची संधी मिळालेली नाही. ही बाब लक्षात घेता, आता आदिवासी समाजातील संचालकाला सभापतीपदाची संधी देणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 आदिवासीबहुल असताना बाजार समितीच्या सर्वोच्च पदावर आदिवासी समाजाला संधी मिळाली पाहिजे. केवळ प्रतिनिधित्वापुरते मर्यादित न राहता, निर्णयप्रक्रियेतही आदिवासी समाजाला नेतृत्व करण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे आगामी सभापतीपदासाठी आदिवासी समाजातील संचालकाचा विचार करून सामाजिक न्यायाची भूमिका घ्यावी,” अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष बाळू पाटील पवार यांनी मांडली.

किनवट कृषी उत्पन्न बाजार समिती यापूर्वी सोयाबीनच्या चुकार्‍यासंदर्भातील प्रश्न, सुमारे तीन कोटी रुपयांच्या कथित आर्थिक अनियमिततेचे आरोप आणि न्यायालयीन वाद अशा विविध कारणांमुळे चर्चेत राहिल्याचे बाळू पाटील पवार यांनी नमूद केले. त्यामुळे आता बाजार समितीला सक्षम, पारदर्शक आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारे नेतृत्व मिळणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार भीमराव केराम यांनी पुढाकार घ्यावा!

किनवट तालुक्याचे आमदार तथा मित्रपक्षाचे नेते भीमरावजी केराम साहेब यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष बाळू पाटील पवार यांनी केले आहे. आदिवासी समाजातील संचालकाला सभापतीपदाची संधी मिळवून देण्यासाठी आमदार भीमराव केराम यांनी पुढाकार घ्यावा आणि किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात आदिवासी समाजाला पहिल्यांदाच सभापतीपदाचा मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

“ही मागणी कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नसून आदिवासी समाजाला न्याय्य प्रतिनिधित्व मिळावे, या भावनेतून करण्यात येत आहे. किनवटच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात आदिवासी समाजातील व्यक्तीला बाजार समितीच्या सभापतीपदाचा मान मिळाल्यास तो संपूर्ण आदिवासी समाजासाठी अभिमानाचा क्षण ठरेल,” असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष बाळू पाटील पवार यांनी स्पष्ट केले.

आता आमदार भीमराव केराम या मागणीबाबत काय भूमिका घेतात आणि किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आगामी सभापती निवडीमध्ये आदिवासी समाजाला संधी मिळते का, याकडे तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post