सिंदखेड येथे चारा साक्षरता अभियान; निकृष्ट चारा सकस करण्याचे पशुपालकांना प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन

पशुसंवर्धन


युरिया-मोलॅसिस प्रक्रियेसह मुरघास निर्मिती, वैरण बियाणे व पशुधन विम्याबाबत जनजागृती




सिंदखेड, ता. माहूर, जि. नांदेड : दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्ध व्हावा आणि उपलब्ध चाऱ्याचा शास्त्रीय पद्धतीने उपयोग करता यावा, या उद्देशाने पशुसंवर्धन विभागाच्या वतीने चारा साक्षरता अभियानांतर्गत गुरुवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सिंदखेड येथे पशुपालकांसाठी विशेष मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.


या कार्यक्रमात वाळलेल्या सोयाबीनच्या कुटारावर युरिया-मोलॅसिस प्रक्रिया करून निकृष्ट चारा सकस करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच हिरवा व वाळलेला चारा कडबाकुट्टी यंत्राद्वारे वापरणे, मुरघास निर्मिती, गाळपेरा नियोजन, चाऱ्याची नासाडी टाळणे आणि उपलब्ध चाऱ्याचा कार्यक्षम वापर याबाबत पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले.



वैरण बियाणे व पशुधन विम्याबाबत जनजागृती

यावेळी मुरघास निर्मिती, अझोला उत्पादन, वैरण बियाणे अनुदान योजना आणि पशुधन विमा याबाबतही माहिती देण्यात आली. वैरण बियाण्यांसाठी अनुदान मिळविण्याच्या उद्देशाने ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पशुपालकांना समजावून सांगण्यात आली. डॉ. रवींद्र रमेश राजगुरू यांनी शेतकरी व पशुपालकांना सोप्या भाषेत मार्गदर्शन करून चारा व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून दिले.


‘सोयाबीनचा भुसा किंवा मका जाळू नका; पशुधनासाठी जतन करा!’


यावेळी डॉ. रवींद्र रमेश राजगुरू यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनाचे संरक्षण करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, “१९७२ च्या दुष्काळात आमचे आजोबा उपाशी राहिले; मात्र २०२७ चा दुष्काळ मुक्या जनावरांसाठी येऊ देणार नाही. माहूर तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाची संपूर्ण टीम एकत्रितपणे काम करत आहे.”


सोयाबीनचा भुसा, मका किंवा इतर उपलब्ध चारा जाळून न टाकता त्याचे योग्य पद्धतीने जतन करावे. उन्हाळ्यात हाच चारा पशुधनाच्या उपयोगी येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक पशुपालकाने चारा बचतीला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.


पशुसंवर्धन विभागाच्या टीमचे सहकार्य


मा. सहायक आयुक्त डॉ. संदीप भुजबळ, डॉ. संतोष दांडेकर, डॉ. पांडुरंग हंबर्डे, डॉ. श्याम पवळे आणि डॉ. प्रशांत बरगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सिंदखेड पशुवैद्यकीय चिकित्सालयाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे डॉ. रवींद्र रमेश राजगुरू, पशुसेवा दाते व चारा मित्र श्री. अजय गट्टेवार, नंदकिशोर नागोराव चौलवार, प्रशांत देविदास बंडेवार, सुजल प्रकाश मदनवार, भूमन्ना गंगाना सील दरवार, अजय संजय गट्टेवार, संकेत सतीश नुकलवार यांच्यासह परिसरातील शेतकरी व पशुपालक उपस्थित होते.


माहूर तालुक्यातील पशुसंवर्धन विभागातील विजय जाधव, आकाश मिराशे, मनोज गेडाम, संदीप चिलकेवार आणि वैष्णवी कोठूलवार देशमुख यांच्यासह सहकाऱ्यांचेही या उपक्रमासाठी सहकार्य लाभत असल्याचे सांगण्यात आले.

सिंदखेड येथील पशुपालकांनी अतिरिक्त कार्यभार सांभाळून मार्गदर्शन केल्याबद्दल डॉ. रवींद्र रमेश राजगुरू यांचे आभार मानले.


“चला, चारा वाचवूया; पशुधनाचे भविष्य सुरक्षित करूया!” हा संदेश देत चारा साक्षरता अभियान हे पशुधनाच्या पोषणासाठी आणि संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post