आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी तज्ज्ञांकडून तपासणी ; नागरिकांना निरोगी जीवनशैलीचे मार्गदर्शन
विदर्भ संपादक मिलिंद जामनिक
मूर्तिजापूर : राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापूर येथे बुधवार (दि. ११ मार्च २०२६) रोजी भव्य मोफत आयुष रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी तज्ज्ञांकडून नागरिकांची तपासणी करून मोफत औषधांचे वितरण करण्यात आले.
या शिबिराच्या प्रमुख अतिथी म्हणून डॉ. संदीश साखरे उपस्थित होते. त्यांनी निरोगी जीवनशैली आणि आयुर्वेदाच्या महत्त्वाविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधीक्षक राजेंद्र नेमाडे होते. यावेळी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य सुभाष गोसावी व सुनिल लछुवानी यांची उपस्थिती होती.
ही शिबिर योजना जिल्हा आयुष अधिकारी डॉ. जावेद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. आयुष अधिकारी डॉ. मनिष ठाकरे व डॉ. रुपाली गुजर यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.
शिबिरामध्ये प्रख्यात वैद्य राजेश भोंडे व वैद्य निखिल बक्षी यांनी आयुर्वेदिक तपासणी करून रुग्णांना उपचार दिले. तसेच डॉ. सोनल सुर्यवंशी यांनी होमिओपॅथी उपचार देत त्याचे महत्त्व पटवून दिले. डॉ. मोहम्मद राजिक यांनी युनानी पद्धतीने चिकित्सा करून रुग्णांना युनानी औषधे उपलब्ध करून दिली.
यावेळी निमा सचिव डॉ. मुलमुले मॅडम यांनी योग मार्गदर्शन करून योग, योगासन, योग्य आहार, दिनचर्या आणि निरोगी जीवनशैली यांचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगितले.
शिबिराचे आयोजन आयुष अधिकारी डॉ. दिपाली वडतकर यांनी केले. या शिबिराला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून तपासणी व उपचारांचा लाभ घेतला.

