अकोला, अमरावती व वाशिम जिल्ह्यांतून वर्षभरासाठी बंदी; पोलिसांची कडक कारवाई
विदर्भ संपादक मिलिंद जामनिक
मूर्तिजापूर : शहरातील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर लगाम घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पाऊल उचलत कुख्यात गुन्हेगार किर्ती व्यंकट गुंजाळ वय ४०, रा. वडरपुरा याला एक वर्षासाठी तीन जिल्ह्यांतून हद्दपार केले आहे. मूर्तिजापूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील त्याच्या सातत्यपूर्ण गुन्हेगारी कारवायांमुळे ही निर्णायक कारवाई करण्यात आली.
पोलीस अभिलेखानुसार गुंजाळ याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे नोंद आहेत. त्यामध्ये अल्पवयीन मुलामार्फत अंमली पदार्थांची वाहतूक, अवैध दारू वाहतूक, सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणे, अश्लील कृत्ये व गाणी सादर करणे, इच्छापूर्वक दुखापत करून धाकदपटशा करणे तसेच महिलेच्या संमतीशिवाय गर्भपात घडवून आणणे अशा प्रकारांचा समावेश आहे.
या सर्व प्रकरणांमुळे त्याच्यावर यापूर्वी अनेकदा प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. मात्र, वारंवार सूचना व कारवाईनंतरही त्याच्या वर्तनात कोणताही सुधार दिसून न आल्याने पोलिसांनी कठोर निर्णय घेतला. अखेर महाराष्ट्र पोलीस अँक्टच्या कलम ५६ अंतर्गत हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. सर्व कायदेशीर प्रक्रियांची पूर्तता करून उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी आदेश जारी करत गुंजाळ याला अकोला ,अमरावती व वाशीम या तीन जिल्ह्यांतून एक वर्षासाठी हद्दपार केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलीस निरीक्षक अजित जाधव, पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे, पोलीस कर्मचारी मुकेश कंटाळे व जीवन अंभोरे यांनी या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली.
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून अशा प्रकारची कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
