सोनोरी परिसरातील घटना ; चालक बचावला, लाखोंचे नुकसान
विदर्भ संपादक मिलिंद जामनिक
मूर्तिजापूर - तालुक्यातील सोनोरी परिसरात राष्ट्रीय महामार्ग ५३ वर लोखंडाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र ट्रकसह त्यातील संपूर्ण लोखंडी माल जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा येथून भुसावळच्या दिशेने लोखंड घेऊन जाणारा ट्रक मूर्तिजापूरजवळील सोनोरी परिसरातून जात असताना वाहनातून अचानक धूर निघू लागला. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले आणि संपूर्ण ट्रक पेटला. आगीची तीव्रता एवढी होती की अल्पावधीतच ट्रक पूर्णतः जळून खाक झाला.
या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर शहर व ग्रामीण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. त्यानंतर वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली. ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच वाहनाबाहेर उडी मारल्याने जीवितहानी टळली.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
