विदर्भ संपादक मिलिंद जामनिक
मूर्तिजापूर – येथील रेल्वे स्थानकावर ४ फेब्रुवारी रोजी घडलेल्या चेन स्नॅचिंग प्रकरणाचा लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या पंधरा दिवसांत छडा लावला असून एका अल्पवयीन मुलासह तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
प्राप्त माहितीनुसार, यवतमाळ येथील सौ. पूजा भूषण मेश्राम,वय ४०, रा. बालाजी नगर, नवी वस्ती, यवतमाळ या पतीसमवेत अकोला येथील लग्नसमारंभ आटोपून ४ फेब्रुवारी रोजी काचीगुडा–नरखेड एक्सप्रेसने बडनेरा येथे जात होत्या. गाडी मूर्तिजापूर स्थानकावरून सुटत असताना खिडकीजवळ बसलेल्या महिलेच्या गळ्यातील सुमारे १५ ग्रॅम वजनाची, अंदाजे ६७,५०० रुपये किंमतीची सोन्याची चेन अज्ञात व्यक्तीने चलाखीने ओढून घेतली व पसार झाला.
या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्यात आली. मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथील आदित्य अजाबराव तायडे,वय १८ याने हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले. चोरीनंतर त्याने ही सोन्याची चेन अंबा नगर येथील रुपेश रमेश श्रीवास याच्या मदतीने ‘वैष्णवी ज्वेलर्स’च्या संचालकाकडे गहाण ठेवल्याचे उघड झाले. चौकशीदरम्यान या प्रकरणात एक आरोपी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले.
ही कारवाई लोहमार्ग पोलीस (जीआरपी, अकोला) व मूर्तिजापूर पथकाने संयुक्तरीत्या केली. तसेच रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजचा तपासात महत्त्वपूर्ण उपयोग झाला. पुढील तपास रेल्वे पोलीस उपनिरीक्षक वडतकर करीत आहेत.
या यशस्वी कारवाईमुळे रेल्वे स्थानक परिसरातील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.
