छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मूर्तिजापूर भगवामय...!

 



पालखी व मोटारसायकल रॅलीत स्वराज्याचा उत्स्फूर्त जयघोष


Vidarbha Editor Milind Jamnik


मूर्तिजापूर : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त शहरात अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मराठा समाजाच्या वतीने मारुती संस्थान श्रीराम मंदिर येथून महाराजांच्या पालखीचे भव्य आयोजन करण्यात आले. टाळ-मृदुंगाच्या गजरात, दिंडीच्या तालावर आणि “छत्रपती शिवाजी महाराज की जय”च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

भगवे फेटे, पारंपरिक कुर्ते आणि महिलांनी परिधान केलेल्या भगव्या नऊवारी साड्यांमुळे संपूर्ण शहर भगवामय झाले होते. पालखीचे विसर्जन छत्रपती शिवाजी स्मारक चौक येथे करण्यात आले. त्यानंतर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी आणि राजमाता जिजाबाई यांच्या अर्धाकृती पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी आमदार हरिष पिंपळे, नगराध्यक्ष हर्षल साबळे, उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार, तहसीलदार श्रीमती शिल्पा बोबडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली मुळे, ठाणेदार अजित जाधव, श्रीधर गुट्टे तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि सर्व पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातून संपूर्ण शहरभर भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. सहभागी युवकांच्या हातात भगवे झेंडे, मुखी जयघोष आणि डोळ्यांत स्वराज्याचा अभिमान दिसून येत होता. ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देत आणि स्वाभिमानाचा संदेश देत साजरी झालेली ही जयंती मूर्तिजापूरच्या सामूहिक चेतनेत नव्या उमेदीने कोरली गेली.

Post a Comment

Previous Post Next Post