शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी पाऊल पुढे : " फार्मर कप २०२६ " प्रशिक्षणाला हिरवी झेंडी
ज्ञान, तंत्रज्ञान आणि उत्पन्नवाढीचा ध्यास : मूर्तिजापूरच्या शेतकऱ्यांची प्रगतीकडे नवी झेप
मूर्तिजापूर - कृषी विभाग मूर्तिजापूर तालुका, उमेद अभियान मूर्तिजापूर, पोकरा प्रकल्प व पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या " फार्मर कप २०२६ " अंतर्गत तीन दिवसीय निवासी प्रशिक्षणासाठी तालुक्यातील ६० शेतकरी आज रवाना झाले. या बसला आमदार हरिष पिंपळेव उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छा दिल्या.
सदरचे प्रशिक्षण दिनांक २० ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान कृषी विज्ञान केंद्र बडनेरा जिल्हा अमरावती येथे आयोजित करण्यात आले आहे. मूर्तिजापूर तालुक्यातून प्रथमच एवढ्या संख्येने महिला व पुरुष शेतकरी निवासी प्रशिक्षणासाठी सहभागी होत असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी गटविकास अधिकारी मिलींद मोरे, तालुका कृषी अधिकारी दीपक तायडे, पंचायत विस्तार अधिकारी विजय किर्तने, चेतन राठोड, उमेद अभियान मूर्तिजापूरचे तालुका व्यवस्थापक, संघपाल वाहूरवाघ,पानी फाउंडेशन, अकोला तसेच तालुक्यातील सहाय्यक कृषी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार हरिष पिंपळे यांनी शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी शुभेच्छा देताना आशावाद व्यक्त केला की, या प्रशिक्षणातून शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पन्न कसे मिळवायचे, योग्य फवारणी तंत्र, पाण्याचे नियोजन, तसेच उत्पादनाचे पॅकिंग व बाजारात अधिक दर कसा मिळवायचा याबाबत मार्गदर्शन मिळेल. प्रशिक्षणानंतर सहभागी शेतकरी तालुक्यातील इतर शेतकऱ्यांनाही या ज्ञानाचा लाभ देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या उपक्रमामुळे मूर्तिजापूर तालुक्यात आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


