" मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा " उपक्रमात तिसरा क्रमांक मिळविण्यात मोलाचा वाटा
मूर्तिजापूर - तालुक्यातील दताळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे कर्तव्यदक्ष माजी मुख्याध्यापक तथा आदर्श शिक्षक अविनाश पुरुषोत्तम कडू यांची शासकीय बदली दुसऱ्या शाळेत झाल्याने त्यांना सोमवारी (दि. १६) भावपूर्ण निरोप देण्यात आला. हा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दताळा येथे उत्साहात पार पडला.
श्री. कडू यांनी दि. १९ जून २०१४ ते दि. ९ जानेवारी २०२६ या कालावधीत शाळेत अखंडित सेवा बजावली. शिक्षण क्षेत्रातील विद्यादानासारख्या पवित्र कार्यात त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी सांभाळताना शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासोबतच भौतिक सुविधांनी सुसज्ज अशी शाळा उभी करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिला.
" मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा " या उपक्रमांतर्गत सन २०२४-२५ मध्ये शाळेला तिसरा क्रमांक मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या कार्यकाळात शाळेची शैक्षणिक उंची लक्षणीयरीत्या वाढल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक निलेश भारसाकळे व सहाय्यक शिक्षिका रुक्मिणी खांडे यांच्या हस्ते श्री. कडू यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनीही भेटवस्तू देऊन आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश खांडेकर यांच्या हस्तेही त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी गावच्या सरपंच मयुरी खांडेकर, पोलीस पाटील राजेंद्र काकड, ज्येष्ठ नागरिक प्रल्हाद खांडेकर, शालेय पोषण आहार कर्मचारी राहुल खांडेकर, पालक प्रतिनिधी सुधीर खांडेकर तसेच केंद्रातील शिक्षक अमोल कावरे, गोपाल राजूरकर, सतीश वसु आदी मान्यवर उपस्थित होते.
मनोगत व्यक्त करताना उपस्थितांनी श्री. कडू यांच्या कार्याचे कौतुक केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास ग्रामस्थ, पालक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. वातावरण भावूक झाले असून उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

