विशेष प्रतिनिधी संतोष भालेराव
अमरावती : अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांना या वर्षाचा प्रतिष्ठेचा "स्कॉच अवॉर्ड" प्राप्त झाला आहे. हे पारितोषिक त्यांना मेळघाटमधील कुपोषण, बालमृत्यू व मातामृत्यू रोखण्यासाठी राबवलेल्या ‘मिशन मेळघाट 28’ या नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी प्रदान करण्यात आले आहे.
जानेवारी 2022 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे धारणी आणि चिखलदरा तालुक्यांतील कुपोषणाचे प्रमाण कमी झाले असून संस्थात्मक प्रसूतीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचा थेट परिणाम म्हणून 2022 पासून आई व बाळाच्या मृत्यूच्या घटनांमध्ये घट झाली आहे.
मिशन मेळघाट 28 या उपक्रमाची नोंद देशभरातून निवडलेल्या 1000 प्रकल्पांपैकी एक म्हणून झाली. या प्रकल्पाचे पहिले सादरीकरण 26 मार्च रोजी सीईओ संजीता महापात्र यांनी स्कॉच ज्यूरी सदस्यांसमोर यशस्वीपणे सादर केले. त्यानंतर ‘ऑर्डर ऑफ मेरीट’ साठीची रेटिंग प्रक्रिया पार पडली, ज्यातून 50 प्रकल्पांची सेमी फायनल साठी निवड झाली.
६ जून रोजी अंतिम सादरीकरणात देशभरातून निवडलेल्या 20 उत्कृष्ट प्रकल्पांमध्ये मिशन मेळघाट 28 ची निवड झाली आणि या उपक्रमासाठी संजीता महापात्र यांना स्कॉच अवॉर्ड जाहीर करण्यात आला.
स्कॉच अवॉर्ड- हा देशासाठी योगदान देणाऱ्या नामवंत व्यक्तींना दिला जाणारा पुरस्कार आहे. पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण, डिजिटल टेक्नोलॉजी आणि जिल्हा प्रशासन आदी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येते.
सीईओ संजीता महापात्र यांच्या दूरदृष्टी, प्रयत्नशीलता आणि सामाजिक बांधिलकीची ही राष्ट्रीय स्तरावर मिळालेली पावती आहे. अमरावती जिल्ह्याच्या नावावर या पुरस्कारामुळे अभिमानाची नोंद झाली आहे. सप्टेबर २०२५ मध्ये नवी दिल्ली येथे अर्वाड वितरण होणार आहे.