"जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती गठीत करण्याचे दिले आदेश"
प्रहार संघटनेचे आंदोलन सफल !
अंजनगाव नगरपरिषद चौकशीच्या फेऱ्यात !
अमरावती, अंजनगाव सूर्जी : अंजनगाव सुर्जी नगरपरिषद अंतर्गत शहरात मोठ्या प्रमाणात कामे चालू असुन ती कामे मर्जीतील कंत्राटदारांना देण्यात आले होते. मर्जीतील कंत्राटदार काम करत असताना निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या अनेक तक्रारी होऊन स्थानिक नगरपरिषद प्रशासन कोणत्याही प्रकारची तक्रारींची दखल न घेतल्याने प्रहार संघटनेचे उपजिल्हाप्रमुख शंभू मालठाणे यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार दाखल केली होती. जिल्हा प्रशासनाने तक्रारींची दखल न घेतल्याने अखेर प्रहार संघटनेच्या वतीने पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते. शुक्रवारी सकाळी ११ वाजता आंदोलनाला सुरुवात होऊन स्थानिक प्रशासनाने सायंकाळपर्यंत आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र जोपर्यंत निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामांची चौकशी करण्यासाठी चौकशी नेमण्यात येणार नाही समिती तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार प्रहार संघटनेने केला होता. संध्याकाळी १० वाजता दर्यापूर मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांनी मध्यस्थी करून जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याशी संपर्क साधून प्रहार संघटनेच्या मागण्या मान्य करून निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी समिती गठीत करुन अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन मागे घेतले. यावेळी आमदार गजानन लवटे, तहसीलदार पुष्पा सोळंके नगरपरिषदचे उपमुख्याधिकारी गोविंद त्रिपुरारी माजी नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे मोहम्मद सिद्दीक मंगेश लांडे महेंद्र दिपटे उपस्थित होते.