५३ ग्रामपंचायत मध्ये एकाच व्यक्तीची अनेक ठिकाणी नेमणूक
माहिती अधिकारातून प्रकार उघड
शासनाकडून लाटला जातोय पगार..! कारवाईची मागणी...!
बारामती : तालुक्यातील ९९ पैकी ५३ ग्रामपंचायतीत एकाच व्यक्तीची अनेक पदांवर नेमणूक झाली आहे.
माहिती अधिकारातून ही बाब उघड झाली आहे. एकच व्यक्ती अनेक ठिकाणी काम करत शासनाकडून पगार, मानधन लाटत आहे.
बारामती तालुक्यातील अंजनगाव, भिलारवाडी, घाडगेवाडी, खंडोबाची वाडी, जैनकवाडी,जळगाव क. प., खांडज, सदोबाची वाडी, सांगवी, सस्तेवाडी, सायंबाची वाडी, सोरटेवाडी, झारगडवाडी, वानेवाडी, चोपडज, ढाकाळे, काऱ्हाटी, मळद, पणदरे, पिंपळी, उंडवडी कप, साबळेवाडी, कारखेल, आंबी खुर्द, बऱ्हाणपूर, भोंडवेवाडी, चांदगुडेवाडी, चौधरवाडी, ढेकळवाडी, गडदरवाडी, गाडीखेल, जळगाव सुपे या ग्रामपंचायतीमधील एका कर्मचाऱ्यांची चार ठिकाणी नेमणूक केली असल्याचे धवडे यांनी माहिती अधिकारातून उघड केले आहे.
काही ग्रामपंचायतीत एकाच कुटुंबातील तिघे कामावर आहेत. या संपूर्ण प्रकाराची जिल्हा परिषदेने स्वतंत्र समितीद्वारे चौकशी करत संबंधितांकडून आजवर घेतलेल्या पगाराची वसुली करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते पोपट धवडे यांनी केली आहे.
ग्रामपंचायत कर्मचारी,ग्रामरोजगार सेवक, आशा स्वयंसेविाक, संगणक चालक (सीएससी ऑपरेटर), अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस या पदांपैकी एकाच पदावर काम करत शासनाकडून पगार अथवा मानधन घेणे कायद्यानुसार अपेक्षित आहे. परंतु, बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतीत एकाच वेळी दोन, तीन किंवा चार पदावर एकच व्यक्ती काम करत पगार घेत असल्याचे समोर आले आहे. यासंबंधी उच्चस्तरीय समिती स्थापन करत सखोल चौकशी करण्यात यावी.
लाटलेला पगार किंवा मानधन वसूल करावे, अशी मागणी पोपट धवडे यांनी केली आहे.
माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार जी व्यक्ती ग्रामपंचायत शिपाई, लिपिक, दिवाबत्ती शिपाई, पाणी पुरवठा कर्मचारी म्हणून काम करते, त्याच व्यक्तीकडे ग्रामरोजगार सेवक व सीएससी ऑपरेटरची जवाबदारी देण्यात आली आहे. या प्रत्येक ठिकाणचा पगार, मानधन ही मंडळी घेत आहेत. ग्रामरोजगार सेवक व सीएससी ऑपरेटर अशी दोन्ही कामे करणारांची संख्या यात अधिक आहे. काही ग्रामपंचायतीत एकाच कुटुंबातील एक व्यक्ती चार पदांचा पगार घेत आहे. त्याच कुटुंबातील अन्य दोघेही ग्रामपंचायतीत कामाला आहेत. त्यामुळे एकाच कुटुंबात सहा जणांना पगार, मानधन मिळत असल्याचे उघड झाले आहे.
विशेष म्हणजे काही प्रकरणात एकच महिला तालुक्याच्या दोन टोकांना असलेल्या ग्रामपंचायतीत सीएससी ऑपरेटर म्हणून काम करीत असल्याचे दिसून येत आहे. दूर अंतरावर असलेल्या ग्रामपंचायतीत एकच महिला काम कशी करू शकते? असा सवाल उपस्थित होत आहे. काही ठिकाणी पती दोन ठिकाणी कामावर, तर त्याची पत्नी आणि मुले यांनाही कामाची जबाबदारी मिळाली आहे.
या प्रकाराला खातेप्रमुखही तितकेच जबाबदार आहेत. अशा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी धवडे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे..
"यासंबंधीची तक्रार आमच्या कार्यालयाला प्राप्त झाली आहे. तक्रारदाराने दिलेल्या यादीनुसार माहिती घेतली जात आहे. एकच व्यक्ती अनेक पदांवर काम करून पगार, मानधन घेत असेल तर त्याची वसुली केली जाईल. चौकशीत ज्या ज्या वाबी समोर येतील त्यानुसार कार्यवाही होत राहील..
• अनिल बागल, गटविकास अधिकारी, बारामती पंचायत समिती