शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक
मूर्तिजापूर - शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या ॲग्रिस्टॅक' योजनेंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) घेणे आवश्यक करण्यात आले असून, मंगळवार दि. १५ एप्रिलपासून शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळविण्यासाठी 'शेतकरी ओळखपत्र क्रमांक' असणे अनिवार्य करण्यात आले असल्याचे तालुका प्रशासनाद्वारे कळविण्यात आले आहे.
राज्यातील कृषी क्षेत्रात डिजीटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या उद्दिष्टाने राज्यात ' ॲग्रिस्टॅक' योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू संदर्भिकृत (जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहेत. त्यामधील शेतकऱ्यांचा माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अधिकार अभिलेखातील शेतकऱ्याची आणि शेताची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्याचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतांसह एकत्रितरीत्या शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) देण्यात येत आहे. दि.११ एप्रिल २०२५ च्या शासनाद्वारे काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार आता, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता ॲग्रिस्टॅक योजनेंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) दि. १५ एप्रिलपासून अनिवार्य करण्यात आला असून, दि.२५ एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांनी त्यांचे फार्मर आयडी तयार करून घेण्याचे आवाहन तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

