जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेख
महिलांचे आरोग्य
ती आहे म्हणून सारे विश्व आहे !
ती आहे म्हणून सारे घर आहे !
ती आहे म्हणून सुंदर नाती आहे !
आणि केवळ ती आहे म्हणून सगळीकडे प्रेम आहे !!
तर अशी ही स्त्री जी की संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेत असते पण तिने कुटुंबाचे आरोग्याकडे लक्ष देताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये ती सुदृढ असेल तेव्हाच ती आपल्या कुटुंबाची काळजी व्यवस्थित घेऊ शकते. विशेषता कामकाजी महिला तिला घर आणि कार्यालय दोन्ही ठिकाणी तिचे कर्तव्य पार पाडावे लागतात तिला तिच्या कामातील गुणवत्ता टिकवून ठेवायची असेल तर तिला तिच्या स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे लागेल .
आजच्या घडीला महिलांमध्ये आढळणारे लाइफस्टाइल डिसीजेस म्हणजे जीवनशैलीशी निगडित आजार जसे की लठ्ठपणा, मधुमेह ,हृदयरोग ,उच्च रक्तदाब ,पीसीओडी, कॅन्सर याला कारणीभूत आपली जीवनशैली आहे जसे की बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव ,फास्ट फूड, जंक फूडचे अतिरिक्त सेवन तसेच सध्याची धकाधकीची जीवनशैली व त्यामुळे येणारा ताण याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो.
आपली जेवणाची प्लेट आयसीएमआर ने सांगितल्याप्रमाणे असावी प्लेटची चार भागात विभागणी करावी अर्धा भागा विटामिन मिनरल्स अँटिऑक्सिडेंट देणारे पदार्थ म्हणजे सर्व प्रकारच्या भाज्या आणि फळ असावेत.
एक चतुर्थांश भाग हा प्रोटीन देणारे पदार्थ म्हणजे सर्व प्रकारच्या डाळी ,कडधान्य, तेलबिया ,सुकामेवा असावा.
आणि एक चतुर्थांश भाग हा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणजेच ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू ,तांदूळ, मका, ओट्स इत्यादी असा असावा. नुकतेच 2023 हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आले होते. ज्वारी बाजरी नाचणी इत्यादी धान्य है पूर्वापार चालत आले आहे पण काळाच्या ओघात या धान्यांचा वापर आपल्या आहारात कमी झाला आहे आणि हे मिलेट्स व्हिटॅमिन्स मिनरल्स ,अँटीऑक्सिडेंट ने भरभरून आहेत . कॅल्शियम आयरन सारखी खनिजे त्यात आहेत. फायबर आहेत त्याचा ग्लासेमिक इंडेक्स कमी आहे त्यामुळे मधुमहींसाठी ते उपयोगी आहे .
कामकाजी महिलांनी जाणीवपूर्वक आहाराचे नियोजन करून स्वयंपाक करावा पौष्टिक नाश्ता, पोष्टिक लंच बॉक्स, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तेलबिया ,सुकामेवा ,फुटाणे, फळ ,नारळ पाणी इत्यादी याचे आठवडा भरा आधीच नियोजन करून ठेवावे. अशाप्रकारे आहारासोबत नियमित व्यायाम करावा सोबत सात-आठ तासाची शांत झोप ताण-तणावीरहित जीवनशैली अशा या चार खांबांवर आपले आरोग्य निर्भर आहे .
वयाच्या विविध टप्प्यांवर महिलांच्या आहाराबाबत सांगायचे झाल्यास किशोरवयीन मुलींनी फास्ट फूड चे अतिरिक्त सेवन टाळावे .डायटिंग चुकीच्या पद्धतीने करू नये अन्यथा पुढे जाऊन पीसीओडी ॲनिमिया माळन्यूट्रिशन ला त्या बळी पडू शकतात . आपले शरीर नेहमी अल्कलाइन राहील ऍसिडिक राहणार नाही याची काळजी घ्यावी फास्ट फूड ,साखर, रिफाईंड ,रेडी टू इट , कोल्ड ड्रिंक,अति प्रमाणात चहा कॉफी यामुळे शरीर ऍसिडिक होतं आणि ऍसिडिक शरीर आजाराला आमंत्रण देत. त्यामुळे शरीराला नेहमी अल्कलाइन ठेवावं .त्यासाठी ताजी फळ भाज्यांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करावा.
गर्भवती व स्तनदा मातेने फोलेट ,आयरन कॅल्शियम युक्त पौष्टिक पदार्थाचे अतिरिक्त सेवन करावे. त्यासाठी आहारात सुकामेवा, पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य याचा आवर्जून समावेश करावा .
चाळीशी पन्नाशीतील महिलांना मला एका गरुडाची गोष्ट सांगायला आवडेल .एका गरुडाचे आयुष्यमान सरासरी 70 वर्षाचे असते .पण चाळिशीत त्याची चोच नखे वाकडी होतात त्यामुळे तो शिकार करू शकत नाही .त्याचे पंख जड होतात त्यामुळे तो उडू शकत नाही .अशावेळी त्याच्याजवळ दोन पर्याय असतात लाचारित जगणे किंवा तो आपले वाकलेली नखे व चोच दगडावर आपटून तोडून टाकतो व नवीन नखे व चोच येण्याची वाट पाहतो .नंतर तो चोचीने नखाने जड पंख ओरबडून काढून टाकतो व नवीन पंख येण्याची वाट पाहतो .अशा या वेदनादायी प्रक्रियेतून गेल्यावर पुन्हा नवीन पंख आल्यावर तो पूर्वीप्रमाणे उंच स्वच्छंदी उडू लागतो. चाळिशीतील महिलांना मेनोपॉज च्या काळामध्ये शारीरिक व मानसिक बदलांना सामोरे जावे लागते त्याला त्यांनी खंबीरपणे तोंड द्यावे .चाळीशी नंतर त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या बऱ्याच कमी झालेल्या असतात . त्यांच्यात आत्मविश्वास वाढलेला असतो . यावेळी महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी .स्वतःला वेळ द्यावा .आपल्या मागे राहिलेले छंद जोपासावे. आपल्या कलागुणांना वाव द्यावा . नातलग मित्रपरिवार जपावे . आपलं आयुष्य स्वच्छंदी जगावे .
तर मैत्रिणींनो मला आपल्याला सांगायला आवडेल की
नारी घे तू उंच भरारी ! फिरून पाहू नकोस तू माघारी !!
जागतिक महिला दिनाच्या vi सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा!
अंजली दहात
आहार तज्ञ जिल्हा स्त्री रुग्णालय. अमरावती