विविध उपक्रमातील स्पर्धाच्या पुरस्काराचे वितरण
वर्धा, मंगला भोगे -: देशाची भावी पिढी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असून शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षणासोबतच नैतिक मूल्याची सांगड घालणे काळाची गरज आहे. खाजगी शाळांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण हे एकच परिमाण असून गुणवत्तापूर्ण, तंत्रस्नेही व मूल्याधिष्ठित शिक्षण हाच परिवर्तनाचा मूलमंत्र आहे. शिक्षकांनी या शैक्षणिक परिवर्तनात सकारात्मकतेने सहभागी व्हावे असे आवाहन राज्याचे गृह (ग्रामिण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
आज जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे विविध उपक्रम व स्पर्धाच्या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळे ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वान्मथी सी., शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मनिषा भंडग, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नितू गावंडे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानदा फणसे आदी उपस्थित होते.
शासकीय शाळा बंद होऊन खाजगीकरण होण्याची शिक्षकांच्या मनात असलेली भीती शिक्षकांनी दूर करुन केंद्र व राज्य शासन शासकीय शाळाच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी मोठी गुंतवणूक करीत आहे. त्यामुळे शासकीय शाळा बंद होणार नाही अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी देऊन यासाठी शिक्षकांनी खाजगी शाळेच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान शिक्षण पध्दती अवलंबून गुणवत्ता पूर्ण व वैज्ञानिक शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावे. वर्धा जिल्ह्यातील शाळांचा दर्जा कसा वाढविता येईल व राज्यात वर्धा जिल्ह्याचे शिक्षण क्षेत्रात नाव लौकिक करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे, असेही डॉ. पंकज भोयर म्हणाले.
जिल्ह्यातील आठही तालुक्यात आठ आदर्शशाळा स्थापन करण्यात करण्यात आल्या असून या शाळांच्या इमारतीसोबत भौतिक सुविधा निर्माण करुन देण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. यासाठी प्रत्येक आदर्श शाळांसाठी डायटच्या समन्वय अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी शिक्षकांनी सुध्दा विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी कायम पुढाकार घ्यावा. मुख्यमंत्री माझी शाळा योजनेंतर्गत अकोला येथील शाळेला राज्य स्तरावर पुरस्कार प्राप्त झालेला आहे. शाळेने केलेल्या विकासाचे अनुकरण करुन तेथील शाळेतील सुविधा, शिक्षण प्रणालीचे अवलोकन करण्यासाठी लवकरच अभ्यासदौरा आयोजित करण्यात येणार असल्याचे यावेळी डॉ. पंकज भोयर म्हणाले. राज्यातील शासकीय शाळांना लवकरच केंद्रीय अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असून टप्प्याने टप्प्याने राज्यात हो अभ्यासक्रम लागू करण्यात येणार असल्याचेही श्री. भोयर म्हणाले.
आजची युवा पिढी ही देशाचे भविष्य असून यासाठी विद्यार्थ्यांचा पाया मजबून होणे आवश्यक आहे. यासाइी शिक्षकांनी वैज्ञानिक दृष्टीकोन समोर ठेऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम करावे. शिक्षकांनी नविन तंत्रज्ञान वापराचे कौशल्य आत्मसात करुन विद्यार्थ्यांमध्ये ते रुजविण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी वान्मथी सी म्हणाल्या.
यावेळी 2023-24 मध्ये दर्जेदार शिक्षणासाठी घेण्यात आलेल्या व्हिडिओ स्पर्धेत 750 शिक्षकांनी सहभाग नोंदविला होता या सहभाग नोंदविलेल्या पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पुरस्काराचे वितरण, नवोपक्रम स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार वितरण, जिल्ह्यातील 17 पीएमसी शाळेतील शिक्षकांना शिक्षण शैक्षणिक साहित्याचे वितरण व मिशन समृध्दी अंतर्गत विज्ञान संचाचे वितरण पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक करतांना मंगेश घोगरे यांनी शिक्षकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व विद्यार्थ्यांचे अध्ययन वाढीसाठी 2023-24 मध्ये शिक्षण व्हिडीओ स्पर्धा घेण्यात आली होती यामध्ये जिल्ह्यातील 750 शिक्षकांनी सहभाग घेऊन राज्यस्तरावर व्हिडीओचे ऑनलाईन सादरी करण केले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील शिक्षकांनी राज्यस्तरावर पुरस्कार प्राप्त केलेल्या शिक्षकांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मंगेश घोगरे यांनी केले. कार्यक्रमाला शाळांतील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.