जनतेच्या हितार्थ कामातील दिरंगाई खपवून घेणार नाही - आमदार हरिष पिंपळे

 



मूर्तिजापूर - पाणी पुरवठा विभाग तसेच इतर कोणत्याही विभागातील कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. जनतेच्या गरजांची त्वरित पूर्तता करणे हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे," असे स्पष्ट शब्दांत इशारा आमदार हरिष पिंपळे यांनी अधिकाऱ्यांना दिला. पंचायत समितीच्या वतीने आयोजित आमसभेत विविध विभागांमध्ये अर्धवट राहिलेल्या कामांबाबत नाराजी व्यक्त करत कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

विविध विभागांचे अर्धवट कामे प्रलंबित

या आमसभेत पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या १४ विविध विभागांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. ग्रामीण पाणीपुरवठा, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, कृषी यांसारख्या अनेक महत्त्वाच्या विभागांमध्ये अनेक कामे प्रलंबित असल्याचे समोर आले. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा, रस्ते बांधणी, शालेय पोषण आहार, स्वच्छता मोहिमा यांसारख्या महत्त्वाच्या योजनांवर कामे अपूर्ण राहिल्यामुळे जनतेच्या मूलभूत गरजांवर परिणाम होत असल्याची परिस्थिती आमसभेत अधोरेखित झाली.


आमदारांचा अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा

आमदार पिंपळे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश दिले. "आपल्याला जनतेची सेवा करण्याची संधी आहे, त्यामुळे कोणत्याही कामात विलंब होऊ नये," असे सांगून त्यांनी इतर विभागांनाही त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची ताकीद दिली. इतर विभागांमधील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरही दबाव निर्माण झाला आहे, कारण कामे वेळेवर पूर्ण न झाल्यास त्यांना परिणाम भोगावे लागतील असे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.

जनतेमध्ये चर्चेचा विषय

या आमसभेतील चर्चेवरून जनसामान्यात चर्चा सुरू झाली आहे की, आमसभेच्या उद्देशाच्या तुलनेत समस्यांचे निराकरण कितपत प्रभावीपणे केले जात आहे. आमसभेचा मूळ हेतू विभागांतील प्रलंबित कामांचा आढावा घेणे व त्यावर तातडीने उपाययोजना करणे हा असला तरी, प्रत्यक्षात काही कामांवर ठोस निर्णय घेण्यात आले नाही. यामुळे आगामी काळात विभागीय कामांची गती वाढविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

उपस्थित मान्यवर

आमसभेला आमदार हरिष पिंपळे, उपविभागीय अधिकारी संदिपकुमार अपार, तहसीलदार शिल्पा बोबडे, ग्रामिण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे, भाजपा तालुकाध्यक्ष भुषण कोकाटे तसेच तालुक्यातील अनेक सरपंच, उपसरपंच आणि पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

प्रस्ताविक गटविकास अधिकारी अशोक बांगर यांनी केले, सूत्रसंचालन सांख्यिकी अधिकारी पी.पी. राठोड यांनी केले आणि आभार पुंड मॅडम यांनी मानले.




Post a Comment

Previous Post Next Post