नरहरी राजनगाव ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार – दलित स्मशानभूमी गिळंकृत, फसवणुकीचा प्रकार उघड
गंगापूर : गंगापूर तालुक्यातील नरहरी राजनगाव (पिंपरी) ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा प्रकार उघडकीस आला आहे. गावातील रहिवासी दिलीप चंद्रभान गायकवाड यांनी घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकांना पैसे दिले.
पत्नीचे दागिने मोडून आणि कर्ज काढून पैसे भरल्यानंतर त्यांना आठचा उतारा देण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावाने घरकुलासाठी जागेचे जिओ-टॅगिंग करून पहिल्या हप्त्याची रक्कमही त्यांच्या खात्यात वर्ग केली.
मात्र काही दिवसांनी न्यायालयीन कामासाठी आठचा उतारा घेण्यासाठी ग्रामपंचायतीत गेले असता, त्यांच्या नावाची नोंदच नसल्याचे उघड झाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणात दलित समाजाच्या हक्काच्या जमिनीवरही डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गट नंबर 42, पिंपरी स्मशानभूमी (महार हडकी हाडोळ्याची जागा) असताना ग्रामसेवक शिवाजी पवार यांनी पैसे खाऊन सुवर्ण समाजातील लोकांना बेकायदेशीरपणे आठचे उतारे दिले.
आता तात्कालिक ग्रामसेवक वाघ यांनीही सरपंच व उपसरपंचांना हाताशी धरून दिलीप चंद्रभान गायकवाड यांचे पैसे घेऊन बोगस आठचा उतारा दिला, मात्र त्याची ग्रामपंचायतमध्ये कोणतीही नोंद नाही. सामाजिक कार्यकर्ते भगवान बनकर यांनी हा भ्रष्टाचार उघडकीस आणत जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तसेच बेकायदेशीर कब्जा हटवून हक्कदारांना मूळ जमीन तातडीने परत देण्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. अन्यथा गंगापूर पंचायत समितीसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.