"सरपंचाने केली कंत्राटी अभियंत्यावर कारवाईची मागणी"
विशेष प्रतिनिधी संतोष भालेराव
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील बोराळा येथील अनेक लाभार्थीला घरकुल अनुदानाचा घरकुल न बांधता लाभ तसेच पक्के घर असतानाही परत घरकुलाचा लाभ दिल्याची प्रकरणे समोर येत असताना याप्रकरणी जिल्हापरिषद प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. तालुक्यातील घरकुलांचा हा अनुदान घोटाळा लाखोंच्या घरात असल्याची शक्यता असून, बोगस लाभार्थी, ग्रामसेवक, कंत्राटी अभियंत्यांसह अनेकजण कारवाईच्या रडारवर असल्याने भ्रष्ट अभियंत्यांचे मात्र यामुळे धाबे दणाणले आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना यासह घरकुलासंदर्भात विविध योजना राबविल्या जात आहेत. पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. यामधील अंजनगाव सुर्जी पंचायतसमिती अंतर्गत येत असलेल्या बोराळा या ठिकाणी घरकुल अनुदानाचा लाभदेताना गैरप्रकार, अनियमितता झाल्याच्या तक्रारी पंचायत समिती तसेच जिल्हापरिषद प्रशासनाकडे बोराळा येथील सरपंचा स्वाती संजय काळे यांनी केली होती. त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पडताळणी करण्याच्या सूचना
संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या असुन याबाबत चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. आहे. बोराळा येथील तक्रारीत तथ्य आढळून आल्यास, घरकुल अनुदान वसूल करण्याची कारवाई तसेच कंत्राटी घरकुल अभियंता कपिल कौतीकर यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील बोराळा येथील घरकुल मंजूर असताना घरकुल न बांधता अनुदानाचा लाभ दिल्याचा तक्रारीत आरोप स्वाती संजय काळे यांनी केला होता.
तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने अंजनगाव सुर्जी गटविकास अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
पंचायतसमिती विभागातील घरकुल कंत्राटी अभियंता कपिल कौतीकर यांच्या संगनमताने काही लाभार्थीनी घरकुल योजनेंतर्गत अनुदानाचा लाभघेतल्याच्या तक्रारी असून त्या अनुषंगानेदेखील चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे बोगस लाभार्थी आणि या अनुदान घोटाळ्यात सहभागी असणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.


