दर्यापूर -: पदाचा दुरुपयोग व कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत येवदा ग्रामपंचायत च्या सरपंच प्रतिभा राजेंद्र माकोडे यांना विभागीय आयुक्तांनी सरपंच व ग्रा.प. सदस्य पदावरुन अपात्र केले.याप्रकरणी प्रदीप वडतकर यांनी विभागीय आयुक्तांना तक्रार केली होती. तक्रारमध्ये सांगितले की, येवदा येथील गावठाण हद्दीतील 1 लाख 50 हजार चौरस फुटाची खुली जागा आहे.
सदरची जागा शासनाची परवानगी घेतल्याशिवाय कोणालाही हस्तांतरीत करता येत नाही. परंतु येवदा येथील ही स्थावर मालमत्ता हस्तांतरण करण्याबाबत कोणतेही आदेश नसताना ग्रामपंचायतीने या मालमत्तेची नियमबाह्य पध्दतीने फेरफार घेऊन खाजगी संस्थेला बेकायदेशिर पध्दतीने जागेचा नमुना 8-अ तयार करुन दिला आणि त्या जागेची नोंद करुन ताबा देखील दिला आहे. सदर स्थावर मालमत्तेची नोंद करुन ताबा देण्याबाबत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबतचे सर्व पुरावे तक्रारकर्ते प्रदीप वडतकर व सुयोग टोबरे यांनी आयुक्त कार्यालयाकडे सादर केले होते. या कागपत्रांची पडताळणी करित सरपंच प्रतिभा राजेंद्र माकोडे यांनी त्यांच्या पदाचा
दुरुपयोग तथा कर्तव्यात कसुर करुन वरिष्ठ कार्यालय व शासन निर्णयाचा अवमान केल्याचे दिसून आले. त्यामूळे महाराष्ट ग्रामपंचायत अधिनियम, 1959 चे कलम 39 (1) मधील तरतुदीनुसार त्यांना सरपंच तथा सदस्य पदाकरिता अपात्र घोषीत करण्यात आले.
या निर्णयामुळे दर्यापुर तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अर्जदार यांच्या बाजुने अॅड. अरविंद गुडधे यांनी सक्षम बाजु मांडली. सदर प्रकरणात जमीनीच्या हस्तांतरण केल्याने संबधित सरपंच यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रदीप वडतकर व सुयोग टोबरे यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.