चीनमध्ये पसरलेल्या एचएमपीव्ही व्हायरसमुळे महाराष्ट्रातील आरोग्य विभाग सतर्क
चीनमध्ये कोरोनानंतर आता ह्युमन मेटाप्युमो व्हायरस (HMPV) या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसमुळे चीननंतर आता इतर देश देखील अलर्ट मोडवर आले आहेत. भारतामध्ये खबरदारी घेण्यास सुरूवात झाली आहे. एचएमपीव्ही व्हायरसमुळे राज्याचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. राज्यात एकही रुग्ण नसल्याचा दावा आरोग्य विभागाद्वारे करण्यात आला आहे.
एचएमपीव्ही व्हायरसमुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून सर्दी, खोकला आणि 'सारी'च्या रुग्णांचे सर्वेक्षण अधिक गतिमान करून अहवाल सादर करण्याच्या सूचना सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यात आल्या आहेत. चीनमध्ये 'ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस'चे (एचएमपीव्ही) रुग्ण आढळून येत असल्यामुळे राज्याचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे. आरोग्य विभागाकडून महत्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
राज्यात आतापर्यंत 'एचएमपीव्ही' व्हायरसचे रुग्ण आढळून आलेले नाही. तसेच श्वसनविकाराच्या आजारांमध्ये वाढ झाली नसल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी चिंता करण्याचे काहीच कारण नाही. महत्वाचे म्हणजे खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने नागरिकांना काही सूचना केल्या आहेत त्याचे सर्वांनी पालन करावे असे देखील आवाहन करण्यात आले आहे.
काय करावे..?
• शिंकताना, खोकताना रुमालाचा वापर करावा.
• हात वारंवार धुवावे.
• पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे.
• ताप, खोकला असताना सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहावे.
• संसर्ग कमी करण्यासाठी हवा खेळती ठेवावी.
• काय करू नये?
• स्वतःच्या मनाने औषधे घेऊ नये.
• आजारी लोकांशी संपर्क टाळावा.
• सार्वजनिक ठिकाणी भुंकणे टाळावे.
• डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये.