Torres Scam • पैसे डबलचा मोह नडला..! कंपनीलाच टाळं; गुंतवणूकदार संतापले..!
थेट ऑफिस गाठून राडा केला..!
Torres Scam • टोरेस कंपनीने गुंतवलेल्या रकमेच्या दहा टक्के अधिक पैसे दर आठवड्याला देण्याचे आश्वासन दिले.
अनेकजण बळी पडले. कंपनी बंद पडल्याने लोकांनी शोरुमसमोर गर्दी केली.
विशेष प्रतिनिधी राजीव विश्वकर्मा मुंबई
मुंबईसह आसपासच्या परिसरामध्ये टोरेस नावाच्या एका कंपनीने गुंतवणूकीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक केली आहे. आज दादर, मिरा भाईंदर, तुर्भेसह ठिकठिकाणी टोरेस कंपनीच्या शोरुमबाहेर गुंतवणूकदारांनी गर्दी केली.
कंपनीने दिलेल्या आश्वासनानसार हप्ते मिळत नसल्याने गुंतवणूकदार त्रस्त झाले होते. टोरेस कंपनीने गुंतवणूकदारांना गुंतवलेल्या रकमेच्या दहा टक्के अधिक रक्कम दर आठवड्याला देण्याचे आश्वासन दिले होते. मागील वर्षभरात मुंबईतील विविध भागांमध्ये कंपनीचे शोरुम्स सुरु झाले होते. डिसेंबर महिन्यापर्यंत गुंतवणूकदारांना हफ्ते मिळत होते. मागच्या दोन आठवड्यांपासून पैसे जमा होत नसल्याने गुंतवणूकदार चिंतातूर झाले होते. आज कंपनी बंद पडल्याची माहिती मिळाल्याने गुंतवणूकदारांनी शोरुमसमोर गर्दी केली.
मुंबईतील या कंपनीमध्ये तीन हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी पैसे गुंतवले होते. काही महिन्यातच कंपनीमध्ये लाखो रुपये जमा झाल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान आज (६ जानेवारी) अचानक कंपनी बंद पडली. कंपनीचे दादरमधील मुख्य शोरुम बंद केले गेले. त्यानंतर मिरा भाईंदर, तुर्भे अशा ठिकाणी टोरेसची शोरुम्स बंद झाली. कंपनीचे मुख्य शोरुम बंद झाल्याची माहिती गुंतवणूक केलेल्या नागरिकांना समजली. त्यानंतर सर्व शोरुमसमोर गर्दी व्हायला सुरुवात झाली.
टोरेस कंपनीबाहेर लोकांची गर्दी झाली. रागाच्या भरात काहींनी कंपनीच्या शोरुमवर दगडफेक केली. हा संपूर्ण प्रकार समजताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. ही फसवणूकीची घटना मुंबईतील वेगवेगळ्या भागांमध्ये झाली असल्याने तेथील पोलीस या प्रकरणावर तपास करत आहेत. या कंपनीचा मालक परदेशात असल्याचे म्हटले जात आहे.