पोलिसाने तक्रारदाराला पाच लाख द्यावेत.. राज्य मानवी हक्क आयोगाने दिले आदेश

 



पोलिसाने तक्रारदाराला पाच लाख द्यावेत.. राज्य मानवी हक्क आयोगाने दिले आदेश 



कल्याण : अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्याने तक्रारदाराला चुकीची वागणूक देत त्याला मारहाण केल्याप्रकरणी तक्रारदाराने राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली होती. याची दखल घेत मानवी हक्क आयोगाने आदेश दिले आहे की, पोलिस अधिकाऱ्याने तक्रारदाराला सहा महिन्यांत पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी असे आदेश दिले आहेत. अशी माहिती तक्रारदाराचे वकील गणेश घोलप यांनी दिली.घोलप यांनी सांगितले की, डोंबिवलीत राहणारे केवल विकमणी हे अंबरनाथमधील शिवाजीनगरात क्रिकेटचे टर्फ चालवितात. २० मे २०२३ रोजी या टर्फवर क्रिकेटचा सामना सुरू होता. त्याठिकाणी पोलिस उपनिरीक्षक सुहास पाटील आले. त्यांनी खेळाडूंना शिवीगाळ केली. मारहाण करून २०० उठाबश्या काढण्यास सांगितले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यापूर्वी त्यांनी विकमणी यांना मारहाण करून त्यांच्या विरोधात कारवाई केली होती.




शपथपत्र सादर करण्याचे आदेश


या प्रकरणी विकमणी यांनी सरकारच्या विविध विभागांकडे तक्रारी केल्या होत्या, त्यांच्या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने त्यांनी घोलप यांच्या माध्यमातून राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली. या प्रकरणी आयोगाने पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त आणि पोलिस उपनिरीक्षक पाटील यांना नोटीस बजावून शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले.

आयोगाने या प्रकरणी पाटील यांनी तक्रारदार विकमणी यांना सहा महिन्यांत पाच लाख रुपये नुकसान द्यावी. तसेच पाटील यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांची खातेनिहाय चौकशी करावी. त्यांच्या विरोधात दोषारोप पत्र सादर करावे, असे आदेश पोलिस आयुक्तांना दिले आहेत.

महाराष्ट्र पोलिसांना दर महिन्याला सेमिनार प्रोग्रॅम घेऊन नागरिकांशी चांगली वागणूक द्यावी असे निर्देश महासंचालकांना दिले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post