मूर्तिजापूर - अमरावती येथील शिक्षिका आपल्या बहिणीसोबत मूर्तिजापूर येथे सुट्टी असल्यामुळे भेटीला आली होती. स्थानिक बसस्थानकावरून सोमवारी सकाळी ८.३०. वाजताच्या दरम्यान अमरावती जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना अज्ञात भामट्याने तिची पर्स लंपास केली. यामध्ये सोन्याचे दागिने व इतर असा ६६ हजारांचा ऐवज असल्याची तक्रार शहर पोलिस स्टेशनला देण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार अमरावती येथील चैतन्य कॉलनी
शांतीनगर ले-आऊट मध्ये राहणारी रेखा रविकुमार गुल्हाने ,शिक्षिका वय ५७ वर्ष ही सुट्टी असल्यामुळे शनिवारी मूर्तिजापूर येथील तिच्या मावशीकडे बहिणीसह आली होती. दिनांक २३ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान अमरावती जाण्याकरिता बस स्टँडवर जाऊन बसमध्ये चढत असताना ३५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोथ, ५.५०० ग्रॅम सोन्याचे कानातले दोन्हीची किंमत ६५ हजार व रोख एक हजार असलेल्या पर्सची चैन उघडी दिसली. त्यांनी लगेच पर्स पाहिली असता पर्समधील सोन्याचे दागिने व रोख असा ६६ हजारांचा ऐवज अज्ञात भामट्याने लंपास झाल्याची फिर्याद शहर पोलिस स्टेशनमध्ये दिली. यावरून शहर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात भामट्याविरूध्द कलम ३०३ (२) बीएनएस नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आशिष शिंदे करीत आहेत.