मूर्तिजापूर - येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील हेंडज फाट्याजवळ मालवाहू ट्रक डिव्हायडरला धडकून उलटल्याने ट्रकने अचानक पेट घेतला. हा थरारक अनुभव या महामार्गाने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी घेतला असून, सुदैवाने यामध्ये कोणतीच जीवित हानी झाली नसली तरी ट्रकमधील साहित्य व ट्रक बेचिराख झाल्याने मोठे नुकसान झाले. ही घटना दिनांक २२ डिसेंबरला रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. ट्रकला जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
गुजरातकडून कोलकाताकडे ट्रक क्र. डब्ल्यूबी ९५/४०६१ हा मालवाहू ट्रक हेंडज फाट्याजवळ जवळ डिव्हायडरला धडक दिल्याने उलटून पेटला होता. या ट्रकमध्ये हार्डवेअरचे साहित्य व कपड्यांच्या गठाणी असल्याने अल्पावधीतच आगीने रौद्र रूप धारण केले. सुदैवान चालक व क्लिनर खाली उतरल्याने कोणतीच जीवित हानी झाली नसली तर ट्रकसह आतील साहित्याचे मोठे नुकसान झाले. घटना घडली असता काही अंतरावर ग्रामीण पोलीस ठाण्याचे वाहनात पोलीस उपनिरीक्षक रणजित खेडकर, चंदन वानखेडे हेपोकॉ दीपक कानडे, ज्ञानेश्वर रडके, सुदाम धुळगुंडे हे तिकडेच जात असताना घटनेचे गांभीर्य पाहता नगरपालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण करताच अग्निशमन दलाचे चावरे, रवींद्र जवंजल, अब्दुल आसिफ, फायरमनतिलक टाक, अब्दुल सलीम यांनी पेटलेला ट्रक विझविण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे काही काळ महामार्गावरील दोन्हीकडील वाहतूक खोळंबली होती. पुढील तपास ग्रामीण पोलिस करीत आहेत.