सात आरोपी विरूध्द शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल
मूर्तिजापूर - शहर पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन दोन जुगार अड्ड्यांवर काल रात्री टाकलेल्या धाडीत एकूण २ लाख ६२ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ७ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार शहरातील भगतसिंग चौकात गुरांच्या दवाखान्यामागे जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती गस्तीवर असलेले हे.कॉ. सुरेश पांडे यांना मिळताच त्यांनी टाकलेल्या धाडीत आकडे लिहीलेल्या चीठ्या, रोख १ हजार १६५० रुपये, दोन पेन, १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल व ५० हजार रुपये किंमतीची मोटार सायकल क्रमांक एम एच ३० बी ओ ३४३९ असा एकूण ६१ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सैयज नाजीम सैयद ताजु,वय ५२ वर्ष राहाणार रोशन पुरा, मूर्तिजापूर व अनिकेत सतिश शिरभाते वय २४ वर्ष रहाणार टाकवाडी, मूर्तिजापूर या दोन आरोपींविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियमाच्या कलम १२ अ अंतर्गत हे.कॉ.सुरेश पांडे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसऱ्या घटनेत पोलीस उपनिरीक्षक आशीष शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह अवैध धंद्यांवर वचक ठेवण्यासाठी गस्तीवर असतांना काल रात्री मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्यांनी येथील वडर पुऱ्यातील अनिल गुंजाळ यांच्या घरी टाकलेल्या धाडीत २ लाख १ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ५ जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल केला.
घटनास्थळावरून रोख ५ हजार २०० रुपये, ३६ हजार रुपये किंमतीचे ५ मोबाईल, ७० हजार रुपये व ९० हजार रुपये किंमतीच्या दोन मोटार सायकली असा एकूण २ लाख १ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी अनिल रामा गुंजाळ वय ५०वर्ष राहणार वडरपुरा, मूर्तिजापूर, प्रतिक जयराम जाधव वय ४२ वर्ष राहणार एनभोरा, शाहरूख हुसेन वय २६ वर्ष राहणार सोनोरी, सोनोरी, मोहम्मद अतिक मोहम्मद युनुस (वय ३० वर्ष) राहणार सोनोरी,
व धिरज सावलीया बोयत वय ४० वर्ष राहणार प्रतिक नगर, मूर्तिजापूर यांच्याविरूद्ध महाराष्ट्र जुगार आधिनियमाच्या कलम ४, ५ अंतर्गत येथील शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक आशीष शिंदे पुढील तपास करीत आहेत.