जिल्हा नियोजनमधील मागणी तात्काळ नोंदवावी..जिल्हाधिकारी सौरभ कटियार..!

 


 गावाकडची बातमी अमरावती, दि. 23 : जिल्हा नियोजनमधील वितरीत करण्यात आलेला निधी तातडीने खर्च करावा, तसेच आवश्यक असलेल्या निधीची मागणी तातडीने नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजनचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजित मस्के आदी उपस्थित होते. सौरभ कटियार यांनी, निवडणुकीपूर्वी मान्यता घेऊन सुरू करण्यात आलेली कामे चालू ठेवावीत. परंतू ज्या कामांच्या निविदा झालेल्या नाहीत, अशा कामांची आवश्यकता तपासून कामे सुरू करावीत. प्रामुख्याने शाळा दुरूस्तीची कामे तातडीने सुरू करावीत. रस्ते, आरोग्य विभागाच्या कामांचे दायित्व मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे खर्च होऊ शकतील, अशाच कामांचे दायित्व सादर करावेत. तसेच मागील दायित्व पूर्ण करून नवीन कामे घेण्यात यावीत.

     यावर्षीचा निधी खर्च करण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे एक महिन्याच्या आत प्रशासकीय मान्यता घेण्यात यावी. प्रशासकीय मान्यता घेतली नसल्यास निधी इतर विभागाकडे वळता करण्यात येतील. मान्यता दिलेली कामे निविदा प्रक्रिया करून सुरू झाली असल्यास अशी कामे पूर्ण होतील, यासाठी प्रयत्न करण्यात यावे. यामुळे जिल्हा नियोजनचे चित्र चांगले दिसण्यास मदत होईल.


सुशासन सप्ताह प्रभावीपणे राबवावा.


 केंद्र शासनातर्फे सुशासन सप्ताह राबविण्यात येत आहे. हा सप्ताह प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले. नागरिकांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी ई-ऑफीसचा अवलंब करावा, असे आवाहन केले. कार्यालयातील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन तातडीने निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. तसेच कार्यालयातर्फे करण्यात आलेल्या चांगल्या कामांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी, असे निर्देश दिले.



Post a Comment

Previous Post Next Post