चोरी प्रकरणातील आरोपी अटकेत ; मुद्देमाल जप्त

 






मूर्तिजापूर - तालुक्यातील मोहखेड गट ग्रामपंचायत अंतर्गत बाळापूर (कंझरा) येथील एका व्यक्तीच्या घरातील कपाटातून रोख रकमेसह दागिने लंपास केल्याची घटना १२ डिसेंबर रोजी घडली होती. याप्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी गजाआड केले आहे.

           बाळापूर येथील राहुल विलास पुंड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते १२ डिसेंबर रोजी सकाळी शेतात तुरीला पाणी देण्याकरिता गेले होते. काही वेळाने त्यांचे आई-वडील नेहमीप्रमाणे घराला कुलूप लावून चाबी घराच्या बाजूला नायलॉनच्या पिशवीत ठेवून शेतात गेले. यावेळी सकाळपासून बाहेर गेलेला त्यांचा मुलगा घरी आला. त्याला नायलॉन पिशवीत चाबी दिसली नाही. त्याने दुसऱ्या बाजूने दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. त्यावेळी घरातील कपाट उघडे दिसून आले. त्यात ठेवलेली सोन्याची पोत किमत १ लाख ८ हजार व रोख ५ हजार रुपये असे एकूण १ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने घरातून लंपास केल्याचे लक्षात आले. या घटनेची फिर्याद १३ डिसेंबर रोजी ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली. यावरून ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध बीएनएस कलम ३३१ (३), ३०५ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी मनोहर दाभाडे यांनी घटनास्थळाची पाहणी करून लगेच आरोपींना पकडण्याचे निर्देश ठाणेदार श्रीधर गुट्टे यांना दिले होते. या प्रकरणातील सादीक शाह महेबूब शाह (२८) व अल्पवयीन मुलगा या मामा-भाच्यांना ताब्यात घेतले. त्यांनी कबुली दिल्यानंतर आरोपी सादीक शाह याला अटक केली व त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी केली. याप्रसंगी अमलदार दीपक कानडे, ज्ञानेश्वर रडके, पोलिस पाटील जितेंद्र लांडे यांनी आरोपी शोधण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post