मूर्तिजापूर मतदारसंघात केवळ ३ उमेदवारांचे 'डिपॉझिट' वाचले...!

 




१२ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त






मूर्तिजापूर - मतदारसंघात यावर्षी विधानसभेच्या निवडणुकीसाठी १५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मतदारसंघात तिरंगी लढत झाली होती. यानिवडणुकीत १५ पैकी १२ उमेदवारांना आपली अनामत रक्कमही वाचविता आली नाही. केवळ तीन उमेदवारांचेच डिपॉझिट वाचले आहे. यावरून मतदार राजा सुज्ञ झाला असून, केवळ निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांनाच त्यांनी पसंती दिल्याचे दिसून आले.

        नुकत्याच विधानसभा सार्वत्रिक निवडणुका पार पडून त्यांचा निकाल घोषित झाला असून महायुतीमधील भाजपाचे उमेदवार आ. हरिष पिंपळे यांनी धुव्वाधार बॅटीग करीत ९१ हजार ८२० मते घेऊन ३५ हजार ८६४ मताधिक्याने विजयी चौकार मारला. दुसऱ्या क्रमांकावर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी श. प. चे सम्राट डोंगरदिवे यांनी ५५ हजार ९५६ मते घेतली तर वंचित बहुजन आघाडी चे सुगत वाघमारे यांनी ४९ हजार ६०८ मते घेत आपली अनामत रक्कम वाचवली. परंतु इतर १२ उमेदवारांना मात्र नियमानुसार तेवढीही मते नसल्याने त्यांची अनामत रक्कम जप्त झाली.

  निवडणुकीत एकंदर १५ उमेदवार होते. उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रत्येक उमेदवाराला ५ हजार अनामत रक्कम जमा करावी लागते. एकंदर वैध मतांच्या एक षष्ठांश (१/६) मते प्राप्त करणाऱ्या उमेदवारास जमा केलेली अनामत रक्कम परत मिळते. मात्र त्याखाली मते असणाऱ्यांची अनामत रक्कम जप्त करण्यात येत असल्याने मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील १५ पैकी ३ उमेदवार आपली अनामत रक्कम वाचवू शकले तर इतर १२ उमेदवारांची अनामत रक्कम मात्र जप्त करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post