नेर,माहुर, अनिल बंगाळे- विधानसभा निवडणुकीच्या धामधूमीत महसूल यंत्रणा असल्याच्या संधीचा फायदा घेत रेती तस्करांनी रात्रंदिवस रेती उपसा आणि वाहतुकीवर बिनधास्त जोर दिला आहे. सदरची बाब सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर १६ नोव्हेंबरच्या पहाटे २ वाजताचे दरम्यान त्यांनीच पथकाचे नेतृत्व करुन नेर येथून सहा वाहाने धरुन माहूर तहसिल कार्यालयात जमा केली आहेत. दस्तुरखुद्द सहाय्यक जिल्हाधिकारी कावली यांनी रात्री जाऊन धाड घातल्यानंतर माहूरच्या तहसिलदारांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते एवढेच नव्हे तर माहूर महसूल प्रशासनाने रेती तस्करीला मुकसंमती दिल्याशिवाय तस्करी करण्याचे कोणीच धाडस करणार नसल्याची चर्चा ऐकायला मिळते.
राजकीय पक्षांचा सहारा घेत राजकीय पक्षातील खादीवर्दीतील पदाधिकार्यांचा हा तस्करीचा व्यवसाय अनेक वर्षापासून चालू आहे. संपूर्ण महसूल यंत्रणा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे नेमका याच काळात तस्करी वाढली आहे. १५ नोव्हेंबरच्या उत्तरमध्यरात्रीनंतर १६ नोव्हेंबरच्या प्रथम प्रहरीच्या २ वाजताचे दरम्यान सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनीच पथकाचे नेतृत्व करीत नायब तहसिलदार रफिक साहेब, महसूल सहायक धोंड, पथकाचे वाहनचालक मगरे व महसूल सेवक शेळके यांना सोबत घेऊन नेर गाव गाठले. वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांनी माहूर पोलीसांना पाचारण करुन पोलीसांच्या मदतीने सदरची कारवाई यशश्वी केली. सद्या सहाही वाहाने माहूर तहसिलमध्ये मुद्देमालासह जमा केलीत. सहाही वाहन चालकं मात्र वाहाने सोडून पळून गेले. तलाठी बाबर हे पंचनाम्याचे सोपस्कार पूर्ण करुन अहवाल सादर केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
निवडणुकीचे कामकाज सांभाळत सहाय्यक जिल्हाधिकारी कावली यांनी रात्री जाऊन ही धाडशी कारवाई केल्यामुळे तस्करांमध्ये थोडी धाकधूक वाढणे स्वाभाविक आहे. या कारवाईतून एक मात्र स्पष्ट झाले की, माहूरच्या तहसिलदारांचे रेती तस्करीत हात बरबटल्याशिवाय ही तस्करी अशक्यच. ते अनभिज्ञ असूच शकत नाहीत. नेरच्या तलाठ्याची दोन्ही हात तुपात म्हणल्यागत त्यांची काळ्या पैशाची कमाई जोरात असल्याची चर्चा ऐकायला मिळते. माहूर तालुक्यातील रेती तस्करीला लाजवेल अशी रेती तस्करी किनवट तालुक्यातही आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावलींनी किनवट तालुक्यातील रेती तस्करीकडे लक्ष देण्याची गरज आहे. येथे राजाश्रय मिळालेल्यांच्या तस्करीला प्रशासन रोखवण्याचे धाडस करताना दिसत नाही. आजी आणि माजी आमदारांच्या मागेपुढे फिरणार्यांचीच रेती तस्करी मोठ्या प्रमाणात असल्याचे बोलल्या जात आहे. किनवटच्या तहसिलदार शारदा चौंढेकरांनीही पावसाळ्यापुर्वी महसूल पथके तयार करुन कारवाया केल्या. कोठारी शिवारात रात्री १० वाजता जाऊन केलेली कारवाई ही त्यांची शेवटची कारवाई होती. त्यानंतर मात्र त्यांनीही कारवाईची तलवार म्यान केल्याचे पहायला मिळते.