मंगल कार्यालय फुल्ल ; हाटेल धाबे पडले ओस
मूर्तिजापूर - विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत मतदारराजाला खूश करण्यासाठी जेवणावळींना ऊत आला आहे. गावपुढाऱ्यांचा पक्षप्रवेश, समर्थन व नेत्यांच्या सभेनंतर मांसाहारी जेवणाच्या पंगती ऊठत आहेत. एरव्ही धाबे व हॉटेलना प्राधान्य देणाऱ्या उमेदवारांनी या यावेळी मंगल कार्यालये , कार्यकर्त्यांच्या शेतात व सांस्कृतिक हॉलना पसंती दिली आहे. जेवणासाठी स्वतःची यंत्रणा लावल्याने या निवडणुकीत हॉटेल व धाबे ओस पडले आहेत. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी स्वतःची यंत्रणा लावल्याने गावपुढाऱ्यांची चांगलीच गोची झाली आहे. मंडप व्यावसायिक, कॅटरिंग, मजुरांचे ठेकेदार, खानावळी, बेरोजगार युवक, महिलांशिवाय मालवाहू-प्रवासी ऑटो रिक्षा चालकांना सुगीचे दिवस आले आहेत.
विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे.
प्रचारात रॅली, मेळावे, बैठका व सभांचे सत्र सुरू झाले आहे. पक्षप्रवेश, समर्थन व नेत्यांच्या सभांना गर्दी करण्यासाठी आबालवृद्ध महिलांसाठी जेवणावळीचे आयोजन केले जात आहे.
प्रत्येक निवडणुकीमध्ये या जेवणावळी हॉटेल किंवा धाब्यावर दिल्या जात होत्या. पण यामध्ये खर्च जास्त येतो तसेच गावपुढाऱ्याकडून आपल्या मर्जीतीलच बगलबच्चाना जेवण दिले जात होते. यामधून उमेदवारांना मतदारांची नाराजी पत्करावी लागत होती. या निवडणुकीत उमेदवारांनी जेवणावळी हॉटेल व धाब्यावर न देता मंगल कार्यालये निवडली आहेत. या मंगल कार्यालयात जेवण बनवून ते वाढण्यासाठी स्वतःची यंत्रणा तयार केली आहे. कमी खर्चात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रस्सा, भात व मटणाची चार फोडी देऊन मतदारांना खुश केलं जातं आहे. मतदारसुद्धा मिळेल त्या संधीचा फायदा घेत आहेत.
निवडणूक म्हणजे हाटेल चालकांसाठी सुगीचे दिवस. त्यांच्याकडून चार ते पाच महिन्याचा व्यवसाय पंधरा दिवसांत केला जातो. या निवडणुकीतही चांगला प्रतिसाद मिळेल या आशेवर हॉटेल चालक होते. पण उमेदवारांनी जेवणासाठी मंगल कार्यालये निवडल्याने हॉटेल धाबे ओस पडले आहेत.
--------------------------------------
* निवडणूक आयोगाचा कानाडोळा *
निवडणूक लढवायची म्हटली की, उमेदवारासोबत कार्यकर्त्यांचा राबता आलाच. त्यांना सांभाळण्यासाठी दिवसभर रसभरीत खानपान आणि रात्री लाखो रुपये खर्चुन जेवणावळी पार पाडल्या जातात. सकाळच्या नाश्त्याचा खर्च, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणावर खर्च किती असावा, याचे दरपत्रकच आयोगाने तयार केले आहे, पण या जेवणावळी बिनबोभाट चालू आहेत. निवडणूक खर्चाची मर्यादा असूनही या जेवणावळी कशा पार पडतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
-----------------------------
आमचे नुकसान
विधानसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली होती. नवीन कामगार भरती केली होती. चांगला प्रतिसाद मिळेल, असे वाटत होते. चार ते पाच महिन्यांचा व्यवसाय पंधरा दिवसांत होईल असे वाटत होते, पण उमेदवारांनी हॉटेल, धाबे यांच्याकडे पाठ फिरवली आहे. पर्यायाने आमचे नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया एका हॉटेल चालकाने दिली.
---------------------------