बहुतांश What's up गृप वर अथवा इतर समाज माध्यमावर ज्या संदेशांची (टेक्स्ट, इमेजेस, विडीयो) देवाण घेवाण होते अथवा जाणून बुजून होते त्यातील बरेच संदेश कोणत्याही तरी राजकीय / संघटनेच्या विचारांची, नेत्यांची पाठराखण करण्यासाठी, स्तुती अथवा निंदा करण्यासाठी, मुद्दामहून बदनामी / चारित्र्यहनन करण्यासाठी वापरली जातात. उजवी, डावी, मध्यम विचारसरणी पेरणे अथवा प्रतिवाद करणे या साठी होतो.
परंतु दैनदिन जिवनात भेडसावणाऱ्या आरोग्य, शिक्षण, रोजगार, पाणी, प्रवासी वाहतूक इ. मूलभूत प्रश्नांवर मात्र चर्चा होत नाही. माझ्या लहानपणी घाटकोपर येथील काजूपाडा या विभागात श्रमदानाने रस्ता तयार करणे, विहिरी खणणे, मैदान स्वच्छ करणे ही कामे नागरिक एकत्र येऊन करीत असतं. त्या मध्ये आम्ही लहान मुलं ही सहभाग घेत होतो. त्यानंतर महागाई, पाणी, रस्ते इ.अनेक प्रश्नांवर शांततेने मोर्चे, आंदोलन करण्यासाठी मोठ्या संख्येने रस्यांवर येत होते. मुंबई मधील अनेक झोपडी निवासी व कामगारांच्या मोर्चा आंदोलनात तरुणवर्ग ही सामील होत होता. त्यामुळे झोपडी निवासी रहिवासी व कामगार यांच्या हिताचे अनेक कायदे झाले व नागरी सुविधा मिळाल्या.आज चित्र काय आहे. दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या मूलभूत प्रश्नांसाठी आंदोलन करण्याची क्षमता वेगवेगळ्या अस्मितांना/ वैचारिक बांधिलकींना कवटाळून गमावून बसलो आहोत. त्या काळात आजच्या सारखी डिजिटल प्रभावी माध्यम नसतानाही लोक सामाजिक कार्यासाठी एकत्र येत होती परंतु आज मात्र समाज माध्यमामुळे एकत्र येण्या पेक्षा आत्मकेंद्रित होत असून गटा तटात जास्त विभागली जात आहेत. आज प्रत्येक विभागात लोक- प्रतिनिधींच्या अथवा समाज सेवकाच्या बिरुदावली लावणाऱ्यांच्या रुपात काही अपवाद वगळता सरंजामी वृत्ती तयार होत आहेत. या सरंजामी वृत्तींनी संपूर्ण राजकीय व दिखाऊ सामाजिक क्षेत्रावर कब्जा घेतला आहे. त्यामुळे जनतेने आपापली राजकीय वैचारीक बांधिलकी बाजूला ठेवून आपले मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी डिजिटल समाज माध्यमांचा वापर जास्त करायला हवा व मूलभूत समस्या सोडविण्यासाठी आंदोलन करण्यासाठी एकत्र यायला हवे.
किशोर जगन्नाथ गुरव.
मोबाईल नंबर - 9511804912