डोंबिवली(गुरुनाथ तिरपणकर)
भारतीय सैनिकांनी आजपर्यंत स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण कले आहे आणि अखंड करत राहतील. त्यांच्या या उपकारातून कोणीही भारतीय नागरिक कधीच उतराई होऊ शकत नाही, आणि म्हणूनच, आनंदाच्या क्षणी सैनिकांची आठवण ठेवणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य बनते.या गोष्टीची जाणीव ठेवत आणि कारगिल विजयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, भारत विकास परिषद, हुतात्मा कॅप्टन विनयकुमार सचान डोंबिवली शाखेने यंदाच्या वर्षी ५००० भारतीय सैनिकांसाठी दिवाळी फराळ व शुभेच्छा कार्ड भेट म्हणून पाठवण्याचा संकल्प केला होता.फराळाचे सर्व पॅकिंग भारत विकास परिषदेचे सदस्य, डोंबिवली शहरातील राष्ट्राभिमानी नागरिक, विद्यार्थी यांच्या श्रमदानातून झाले. डोंबिवली परिसरातील सुमारे ४० शाळांमधील ५५०० विद्यार्थ्यांनी सैनिकांना देण्यासाठी शुभेच्छा कार्ड बनविण्यात सहभाग घेतला. फराळाच्या प्रत्येक बाॅक्स बरोबर विद्यार्थ्यांनी तयार केलेले एक शुभेच्छा कार्ड सुद्धा जवानांना पाठविण्यात आले.५००० बाॅक्स सीमावर्ती भागातील सैनिकांना पाठवण्याकरता सुमारे २५लाख इतका खर्च आला आहे. लोकसहभागातून ही रक्कम उभी रहात आहे.इच्छुक व्यक्तींनी अॅड.वृंदा कुळकर्णी, अध्यक्षा-भारत विकास परिषद, कॅप्टन विनयकुमार सचान डोंबिवली शाखा, संपर्क क्रमांक-९८२१४२९६७७ तसेच ईमेल-vj19857@gmail.comयावर संपर्क साधू शकतात. मागील वर्षीही डोंबिवली शाखेने दोन हजार फराळाचे बाॅक्स सीमावर्ती सैनिकांसाठी पाठवले होते.वरील प्रमाणे संकल्पपूर्ती होऊन भारताच्या उत्तरेकडील, पूर्वांचलाकडील तसेच पश्चिमेकडील भू व सागरी सीमांवरील ९ पोस्टस् वर फराळाचे बाॅक्स पाठविण्यात आले आणि ते वेळेत पोहोचले आहेत. तसेच संस्थेचे काही सदस्य वेगवेगळ्या सीमा भागांवर, पूर्वपरवानगी घेऊन, सैनिकांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रत्यक्ष भेट देऊन आले आहेत.