ठाणे(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
वर्तमानपत्रातील वृत्तपत्र लेखन हे कोहीनुरच्या हिऱ्यापेक्षाही मौल्यवान आणि तलवारी पेक्षा धारधार मानले जाते. जनसामान्यांच्या प्रश्नांना निर्भीडपणे आणि निस्वार्थीपणे वेदना, व्यथा, मांडीत वृत्तपत्र लेखक नियमितपणे लेखन करीत असतो. जणू तो जगाचा तिसऱ्या डोळ्याची भुमिका बजावीत असतो. ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक विश्वनाथ पंडित हे वयाच्या पंच्याहत्तरीतही सातत्याने लेखन करीत आहेत. त्या माध्यमातून अभ्यासपूर्वक ते समाज घडविण्याचे व राष्ट्रहीत जपण्याचे मोठे काम करीत आहेत, ते करण्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशा शुभेच्छा मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी दिल्या.
ठाणे येथील ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक विश्वनाथ पंडित (साप्ताहिक झुंजार सह्याद्रीचे संस्थापक, संपादक) यांच्या वयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी मालुसरे बोलत होते. पंडितांच्या लेखणीत एवढी धार असते की तलवारीची धार त्यासमोर फिक्की पडतांना दिसून येते. कारण संपूर्ण समाजाच्या नैतिकतेची जबाबदारी वृत्तपत्र लेखकांच्या खांद्यावर असते व ती लेखणीतून निर्माण होत असते असे मी मानतो. पंडितांनी समाजातील विविध प्रश्नांची मांडणी आपल्या लेखणीच्या माध्यमातून करून त्या प्रश्नांना न्याय हक्क देण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांनी मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या वाढीसाठी व अनेक उपक्रम राबविण्यासाठी खूप मेहनत घेतली असेही त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. पंकजकुमार पाटील संपादित 'निर्भीड लेखणीची पंच्याहत्तरी' या विशेषांकाचे प्रकाशनही यानिमित्ताने करण्यात आले. कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आयुष्यभर दुसऱ्यांच्या भल्यासाठी झटण्याचे काम पंडित साहेबांनी केले, अशा ऋषितुल्य आयुष्य जगणाऱ्या व्यक्तिंचा सन्मान हा इतरांना प्रेरणादायी आहे. त्यांचे कार्य समाजासाठी दीपस्तंभासारखे आहे असे मनोगत मनसे ठाणे शहर प्रमुख रवींद्र मोरे यांनी केले.
शारदा समाज सेवा मंडळ तुरंबवचे अध्यक्ष प्रमोद पंडित, ठाणे येथील माजी नगरसेवक कृष्णकुमार कोळी, मनसे ठाणे शहर उपप्रमुख मनोहर चव्हाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक घाग, शिरीष घाग, अनिता कामत, मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे माजी अध्यक्ष विजय कदम, माजी अध्यक्ष मनोहर साळवी, ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक भाऊ सावंत, चिपळूण येथील गरिबांचे डॉक्टर म्हणून ख्याती असलेले डॉ. कृष्णकांत पाटील, डॉ. दर्शना पाटील, रमाकांत राऊत, विजय चव्हाण यांनी पंडितांच्या जीवनाची, सामाजिक कार्याची स्पंदने टिपत त्यांचे मोठेपण श्रोत्यांसमोर मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिया पाटील यांनी केले.