वर्धा , मंगला भोगे : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेमध्ये ज्या शेतक-यांनी मागील महिन्यात आधार प्रमाणीकरण केले आहे अशा जिल्ह्यातील 380 शेतक-यांच्या बँक खात्यावर रु. 1 कोटी 86 लाख रक्कम शासनामार्फत जमा करण्यात आली आहे. या योजनेत राज्यातील 11836 शेतक-यांच्या बँक खात्यावर रु. 46कोटी 70 लाख रक्कम शासनामार्फत जमा करण्यात आली आहे.
यामध्ये यवतमाळ जिल्हयातील 829 शेतक-यांना रु. 352 लाख, जळगांव जिल्हयातील 729 शेतकऱ्यांना रु. 307 लाख, नाशिक जिल्हयातील 713 शेतक-यांना रु. 354 लाख रक्कमेचा लाभ देण्यात आला आहे. या प्रोत्साहनपर लाभ योजनेतंर्गत 33356 शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण केले नसल्याचे शासनाच्या माहे ऑगस्ट 2024 मध्ये निदर्शनास आले होते. त्यामुळे या शेतक-यांना रुपये 50 हजार पर्यतच्या प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळाला नव्हता. या शेतक-यांना आधार प्रमाणीकरणाची संधी दि. 12 ऑगस्ट 2024 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत देण्यात आली होती. या कालावधीत आधार प्रमाणीकरण केलेल्या 11836 शेतक-यांच्या बँक खात्यात रु. 46.70 कोटीची प्रोत्साहनपर लाभाची रक्कम 1 ऑक्टोबर 2024 रोजी वर्ग करण्यात आली आहे. यात वर्धा जिल्ह्यातील 380 शेतक-यांच्या बँक खात्यावर रु. 1 कोटी 86 लाख रक्कम शासनामार्फत जमा करण्यात आली.
जे शेतकरी आधार प्रमाणीकरण करण्यापूर्वी मयत झाले आहेत अशा शेतक-यांच्या वारसांची नांवे योजनेच्या पोर्टलवर समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या प्रक्रियेनंतर आधार प्रमाणीकरण व योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
या योजनेमध्ये सन 2017-18, 2018-19, 2019-20 या तीन वर्षामध्ये कोणत्याही दोन वर्षात बँकेकडून पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेली आहे अशा राज्यातील एकूण 14.50 लाख शेतकऱ्यांना आजपर्यंत एकूण रु. 5310 कोटी रक्कमेचा लाभ देण्यात आला आहे.