जळगाव : भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची असल्यास मार्क्सवाद उपयोगी पडणार नाही या करिता ते बाबासाहेबांच्या शूद्र पूर्वी कोण होते या ग्रंथाचे वारंवार संदर्भ देत असत , पक्षाने आपल्या विचारधारेत भारतीय समाजव्यवस्थेनुरुप बदल करणे गरजेचे आहे अशी स्पष्ट भूमिका शरद पाटील यांनी घेवून मोठे जनआंदोलन उभे केले , प्रसंगी कम्युनिस्ट पक्षाशी द्रोह पत्करला . असे प्रतिपादन शरद पाटील यांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक व शरद पाटील यांचे भाचे सुनील शिंदे यांनी केले .
जळगाव येथील काव्यारत्नवली चौक येथे कॉ. शरद पाटील जन्मशताब्दी निमित्त दिनांक १६ सप्टेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात मुख्यावक्ता म्हणून शिंदे बोलत होते .
शिंदे यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितले की शरद पाटील यांनी आदिवासी लढे उभारून त्यांना न्याय मिळवून दिला , नामांतर प्रश्र्नी , कामगारांच्या प्रश्नी त्यांनी जेल सुध्दा उपभोगली , त्यांनी मार्क्स , फुले , आंबेडकर अशी नवी विचारसरणी मांडली , साहित्याच्या क्षेत्रात परंपरागत व्यवस्थेला छेद देणारे लेखन केले .
प्रसिध्द साहित्यिक जयसिंग वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले की शरद पाटील यांचा इथल्या एकूणच व्यवस्थेचा प्रचंड अभ्यास होता , बुद्ध , मार्क्स , वेद , संस्कृती , पुराणे , फुले , बाबासाहेब , वर्ग , जाती , स्त्रिदास्य , राम , कृष्ण या सारख्या अनेक विषयांवर त्यांनी नव्या दृष्टिकोनातून लेखन करून नवनवे मुद्ये वाचकांच्या समोर मांडलीत. त्यांच्या सोबत काम करतांना असे दिसून आले की ते सामान्य कार्यकर्त्यास बोलते करत , त्यास विचार करण्यास भाग पाडत त्यांच्या या भूमिकेने अनेक साहित्यिक , कार्यकर्ते उदयास आले . परिवर्तनवादी चळवळी पुढं नेण्याकरिता शरद पाटील यांचे विचार स्वीकारावेच लागतील असेही वाघ यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी सांगितले की शरद पाटील हे लढावू बाण्याचे होते , नामांतराचा प्रश्न , आदिवासींच्या वनजमिनीचा प्रश्न , धरणग्रस्त लोकांचा प्रश्न , गिरणी कामगारांचा प्रश्न सोडविण्या करिता त्यांनी जी रस्त्यावरची लढाई लढली त्यात त्यांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही , पोलिसांचे दंडुके त्यांनी सहन केले , जेल मध्ये गेले पण आपल्या कार्यापासून ते दूर गेले नाही . त्यांच्या लिखाणाने , भाषणाने या देशात असंतोष निर्माण झाला , त्यांच्या कम्युनिस्ट पक्षात सुध्दा या संबंधाने मोठे वाद झाले , जाती अंताच्या , वर्ग संघर्ष च्या मुद्यावर त्यांनी पक्षाच्या भूमिकेस विरोध केल्याने शेवटी त्यांना पक्ष सोडावा लागला .त्यांनी सत्यशोधक मार्क्सवादी हा नवा पक्ष काढून आपले कार्य कायम पुढं सुरू ठेवले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सत्यजित साळवे , सूत्रसंचालन बापूराव पानपाटील तर आभार प्रदर्शन प्रा. प्रितीलाल पवार यांनी केले .
सुरवातीस कॉ. शरद पाटील यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमास श्रोते मोठ्यासंख्येने हजर होते . सभासमाप्ती नंतर शरद पाटील जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या.