मुंबई(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवर लवकरच लॉटरी स्टॉल उभारण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू झाले असून पश्चिम व मध्य रेल्वे व्यवस्थापकांकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनित सिंग यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व रेल्वे स्थानकांवर आठ बाय बारा फुट आकाराच्या लॉटरी स्टॉल उभारण्यास परवानगी द्यावी असा प्रस्ताव सादर करण्यात आला गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर सहज लॉटरी तिकीटे त्यामुळे उपलब्ध होतील.
ग्राहकांना बक्षिसे विक्रेत्यांना रोजगार सरकारला महसूल आणि रेल्वे मंत्रालयाला भाडे उपलब्ध होणार आहे. अशा केंद्रामुळे राज्यभरातील बेरोजगारांना रोजगार मिळणार असून लाखो कुटुंबीयांना दिलासा मिळेल यासह अनेक मुद्यांवर सविस्तर चर्चा ही रेल्वे अधिकारी पंकज खन्ना यांच्याशी शिष्टमंडळाने केली. पश्चिम रेल्वे विभागाचे व्यवस्थापक नीरज वर्मा तसेच मध्य रेल्वे विभागाचे व्यवस्थापक रजनीश गोयल यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असून रेल्वे मंत्रालयातील प्रशासकीय विभाग या मागणीवर गंभीरपणे पावले उचलणार आहेत.
नवी दिल्ली येथील रेल भवनात महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री विलास सातार्डेकर यांच्या सह सरचिटणीस राजेश बोरकर, उपाध्यक्ष कमलेश विश्वकर्मा, डॉ. मनीष गवई, कमल सैनी या शिष्टमंडळाचा सहभाग होता. रेल्वे मंत्रालयाच्या सेवाभावी उपक्रमांबद्दल शिष्टमंडळाने कौतुक केले आणि भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या.