सावंतवाडी (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
सावंतवाडी येथील अपूर्ण रेल्वेचे टर्मिनस मार्गी लागावे, येथे सुपरफास्ट गाड्यांना थांबा मिळण्याबरोबरच कोरोना काळात काढून घेण्यात आलेले थांबे पूर्ववत करावे, सावंतवाडी स्थानकाचे नामकरण करावे आदी मागण्यांसाठी आज १५ ऑगस्ट रोजी कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी तर्फे पुकारण्यात आलेले घंटानाद आंदोलन शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार श्री दिपक भाई केसरकर यांचा आश्वासनांअंती तात्पुरते स्थगित करण्यात आले.
कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी तर्फे गेल्या २.५ वर्षात सावंतवाडी स्थानकातील अपूर्ण प्रवासी सुविधा आणि रेल्वेचे अपूर्ण असणारे टर्मिनस पूर्ण करण्यात यावे यासाठी विविध प्रयत्न करण्यात आले होते. २६ जानेवारी २०२४ ला प्रवासी संघटना सावंतवाडी ने आपल्या सलग्न संस्थांना सोबत घेऊन हजारो लोकांचा उपस्थितीत एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन केले होते. तरी देखील शासन आणि प्रशासनाकडून कोणतीही दखल व हालचाल केली गेली नव्हती. परंतु पुन्हा संघटनेने आंदोलन पुकारल्यानंतर लगेच सावंतवाडी स्थानकातील PRS सुविधा ही १२ तास करण्यात आली. आज झालेल्या या आंदोलनात शालेय शिक्षण मंत्री दिपक वसंत केसरकर साहेबांनी सावंतवाडी टर्मिनसला लागणारे पाणी हे तिलारी धरणातून जल जीवन मिशन अंतर्गत मिळेल त्यासाठी ७ कोटी मंजूर आहेत तसेच येथील प्रस्तावित रेलोटेल लवकरच पूर्ण करण्यात येईल आणि टर्मिनस साठी लागणाऱ्या रस्त्याला जिल्हा नियोजन मधून ३ कोटी मंजूर झाले असल्याची माहिती दिली. तसेच येथील रेल्वे थांब्यासाठी पुढील आठवड्यात कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक श्री संतोष कुमार झा यांच्याशी आपल्या अध्यक्षतेखाली संघटनेच्या शिष्टमंडळाची बैठक लावू असे सांगितले.या वेळी त्यांचा सोबत शिवसेना जिल्हाप्रमुख श्री अशोक दळवी, गजानन नाटेकर, आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर श्री राजन तेली तसेच रुपेश जी राऊळ, मायकल डिसोझा यांनी देखील आंदोलन कर्त्यांची भेट घेऊन आंदोलन कर्त्यांची बाजू समजून आपण आपल्या परीने पाठपुरावा करू असे सांगितले. याला प्रतिसाद म्हणून संघटनेचे अध्यक्ष ॲड संदीप निंबाळकर यांनी जर कोकण रेल्वे च्या अधिकाऱ्यां सोबत बैठक लावली नाही आणि आमच्या मागण्या केल्या नाहीत तर गणेशोत्सवाच्या तोंडावर सावंतवाडी स्थानकावर हजारोच्या संख्येने रेल्वे रुळावर बसून आंदोलन करू असा इशारा दिला. यावेळी संघटनेचे सल्लागार बबन साळगावकर, बाळासाहेब बोर्डेकर, सचिव मिहिर मठकर, ॲड नकुल पार्सेकर, नरेंद्र तारी, माजी पंचायत सदस्य शांताराम गावडे, गुणाजी गावडे, भूषण बांदिवडेकर, सागर तळवडेकर, सुधीर राऊळ, सागर नानोसकर, गणेश चमणकर, प्रथमेश पाडगावकर, विनोद नाईक, अभिषेक शिंदे आदी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.