किनवट तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आवाहन
किनवट, अनिल बंगाळे : सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होऊन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची पूर्वतयारी म्हणून ८ जुलै रोजी नांदेड येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने सहकुटुंब सामील व्हावे, असे आवाहन किनवट तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने केले आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण व सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, या मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीसाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनाकरीता जनजागृती करण्यासाठी ६ जुलै ते १३ जुलै दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली काढण्यात येणार आहे. ६ जुलै रोजी शनिवारी पहिली रॅली हिंगोली जिल्ह्यात होणार आहे. रविवारी ७ जुलै रोजी परभणी आणि ८ जुलै रोजी सोमवारी नांदेड येथे भव्य रॅली काढण्यात येणार आहे. नांदेड गुरुजी चौक आणि छत्रपती चौकापासून या रॅलीला सुरुवात होईल. तरोडा नाका, राज कॉर्नर वर्कशॉप आयटीआय चौक मार्गे ही रॅली शिवाजीनगर, वजिराबाद, मुथा चौक मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत हि रॅली निघणार आहे. याच अनुषंगाने सकल मराठा किनवट तालुका समाजाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. समाजाच्यावतीने विश्रामगृह गोकुंदा येथे बैठकीचे आयोजन करून तालुक्यातील सर्वच गावांमध्ये विविध माध्यमांने जनजागृती केली जाणार असून प्रत्येक गावामध्ये मराठा बांधवांच्या बैठकीचे आयोजन करत नांदेड येथे होणाऱ्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे.
या रॅलीमध्ये आलेल्या समाज बांधवांच्या वाहनासाठी कॅनॉल रोड, नवा मोंढा येथील मार्केट कमिटीचे मैदान, हिंगोली गेटजवळ गुरुद्वारा मैदानावर पार्किंगची व्यवस्था केली आहे. तसेच मुक्कामासाठी असलेल्या वाहनांची पार्किंग व्यवस्था नागार्जुना शाळेच्या मैदानात करण्यात आली असून कौठा परिसरातील ओम गार्डन येथे मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे. तालुक्यातील मराठा बांधवांनी सहकुटुंब घराबाहेर पडून ८ जुलै रोजी मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीमध्ये लाखोंच्या संख्येने सामील होऊन दिनांक आठ जुलै रोजी नांदेड येथे होणारी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीसाठी किनवट तालुक्यातून जास्तीत जास्त संख्येने गरजवंत मराठा समाजाने उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाज किनवट च्या वतीने करण्यात येत आहे.