अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व नागरिकांनी आणि नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे. राजकारण विरहित जिल्ह्याचा विकास करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे तरच जिल्ह्याचे चित्र बदलू शकेल असा विश्वास माजी मंत्री ,आमदार ॲड यशोमती ठाकूर यांनी आज व्यक्त केला. शासनाच्या वतीने ज्वारी खरेदी हंगाम सुरु करण्यात आला या खरेदी हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या.
राज्य शासनाच्या वतीने अमरावती जिल्ह्यात ज्वारी खरेदी हंगाम सुरू करण्यात आला आहे. ज्वारीला 3180 रुपये हमीभाव देण्यात आला आहे. या हमीभावानुसार खरेदी शुभारंभ आज अमरावती येथे करण्यात आला यावेळी माजी मंत्री आमदार ॲड.यशोमती ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बाजार समितीचे सभापती हरीश मोरे उपसभापती भैय्यासाहेब निर्मळ मनोज देशमुख पंकज देशमुख हरिभाऊ मोहोळ संजय माला, जिल्हा विपणन अधिकारी नितीन हिवसे, अमित गावंडे अभय देशमुख राजेश बोडके गजानन राठोड दिलीप सोनवणे उपस्थित होते तर पिंपविहीर गावचे शेतकरी श्याम बाबासाहेब केने यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना ॲड. ठाकूर पुढे म्हणाल्या की, पश्चिम महाराष्ट्र मध्ये एखाद्या जिल्ह्याचा विकास करायचा असतो तेव्हा सर्व पक्षीय नेते राजकारण बाजूला विसरून जिल्ह्याच्या नीटनेटक्या विकासासाठी एकत्र येतात. अमरावती मध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे चित्र आपण निर्माण केले पाहिजे राजकारणाच्या वेळी राजकारण करून इतर वेळेस समाजकारण आणि सर्वांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिजे, असे त्या म्हणाल्या. देशामध्ये काँग्रेसच्या अनेक जागा या केवळ 1000 मतांमध्ये पडले आहेत मात्र असे असले तरी अमरावती जिल्ह्यातील आष्टी आणि नांदगाव पेठ येथे जय श्रीराम च्या घोषणा चालले असे म्हटले जात आहे. कोणत्याही जातीय ध्रुवीकरणाला बळी न पडता समाजात तेढ निर्माण न करता एक दिलाने सर्वांनी काम करायला पाहिजे. आगामी विधानसभा निवडणुकीतही धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षांनाच मदत केली पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शेतकरी हिताचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असून शेतकऱ्यांची धान खरेदी योग्य दरात आणि वेळेत व्हायला हवी, सरकारी अधिकारी आज खरेदीसाठी आले आहेत मात्र त्यांनी हे सातत्य राखावे अशा सूचनाही यावेळी ॲड. ठाकूर यांनी दिल्या.