महागांव तालुक्यातील नागरीकांची मागणी
श्रीकांत राऊत यवतमाळ
महागांव येथे कार्यरत असलेल्या ठाणेदाराची हाकलपट्टी करून अवैध धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी महागांव तालुक्यातील नागरीक करत आहे. मागील काही दिवसापासून अवैध धंद्यांनी डोके वर काढले आहेत. महागांव तालुक्यात खुलेआम मटका, गुटखा, देशी दारूची विक्री, जागोजागी क्लब, भरदिवसा जनावरांची तस्करी, रेतीची तस्करी सुरू आहे. महागांव पोलीस स्टेशन अवैध धंद्या वाल्यांकडून मिळत असलेला मलीदा घेवून डोळ्यावर पट्टी लावत आहेत. त्यामुळे एस.पी. साहेबांनी याकडे तात्काळ लक्ष देवून अवैध धंदे बंद करावे अशी मागणी नागरीकातून होत आहे.
चार दिवसा पूर्वी सामाजिक कार्यकर्ते अनंता नागरगोजे यांनी तालुक्यात सुरू असलेले अवैध धंदे व त्यांना खतपाणी घालणाऱ्या ठाणेदार कार्यवाही करा असे निवेदन दिले होते.
तालुक्यातील फुलसावंगी परिसरात रेती तस्करावर मोठी कार्यवाही झाली. दारू नष्ट करण्यात आली. परंतू काही ठीकाणी मटका, गुटखा, क्लब खुले आम सुरु आहे. आमचे कोणीही काही वाकडे करू शकत नाही या गुर्मीत मटका, गुटखा, क्लब चालक वावरत आहेत. या अवैध धंद्यामुळे गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. नागरिक भयभीत झाले आहेत. नागरीकांना दहशेतेखाली राहावे लागत आहे.
यांच्यावर तात्काळ कार्यवाही करा अशी मागणी नागरीकातुन होत आहे.